माती वाचवा विद्यार्थी साखळीतून आदर्श शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिला संदेश

🔸जागतिक मृदा दिन निमित्य सामाजिक भूमिकेवर केली चर्चा

✒️सौ .सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)

 राजुरा(दि.4 डिसेंबर) :- 

        संयुक्त राष्ट्र महासभेने 5 डिसेंबर 2014 ला हा पहिला जागतिक मृदा दिन साजरा केला. थायलंडचे दिवंगत राजे भूमीबोल अदुल्यादेज यांनी मृदा शास्त्र आणि मृदा संवर्धनासाठी प्रचंड मोठे कार्य केले होते. त्यांचा गौरव म्हणून त्यांच्या जन्मदिनी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन म्हणून निवडला गेला. मातीची धूप थांबविणे, तिची सुपीकता टिकवणे , शाश्वत अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. सत्र 2025 यावर्षीच्या जागतिक मृदा दिन चा विषय “निरोगी शहरांसाठी निरोगी माती” असा आहे.

त्यामुळे आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, वसुंधरा मित्रांनी मिळून “माती वाचवा” अशी विद्यार्थी साखळी तयार करून माती जिवंत राहिली तरच मानव जिवंत राहील असा संदेश दिला. राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, वसुंधरा मित्र बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर , स्काउट्स लीडर रूपेश चिडे, विकास बावणे यांच्यासह शिक्षक ,विद्यार्थी यांची उपस्थिती होती. एक इंच मातीचा थर तयार होण्यासाठी निसर्गाला पाचशे ते एक हजार वर्ष लागतात परंतु ती वाहून जायला एक जोरदार पाऊस पुरेसा ठरतो.

माती ही एक जिवंत प्रणाली आहे. सुमारे दहा ग्रॅम सुपीक मातीमध्ये सात अब्ज एवढे सूक्ष्मजीव असतात. जमिनीखालील जैवविविधता ही जमिनीवरील जैवविविधते इतकीच महत्त्वाची आहे. याकरिता पाण्याचे व्यवस्थापन , पीक अवशेषांचे व्यवस्थापन, पिकांची फेरपालट आणि द्विदल पिके, सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा समतोल, मृदा आरोग्य पत्रिकेचा वापर अशा विविध उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. आपल्या घरातील ओल्या कचरा पासून खत तयार करून ते बाग कामासाठी वापरणे , प्लास्टिकचा वापर टाळणे, सेंद्रिय व नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, पर्यावरणपूरक सण उत्सव साजरे करणे, मृदा संवर्धनासाठी जनजागृती करणे आदी विषयांवर बादल बेले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता सातवीच्या भूगोल विषयात मृदा हा पाठ असून विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमुळे नक्कीच फायदा होईल असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. यापूर्वी अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या विद्यार्थी साखळीनी लक्ष वेधून घेतले होते हे विशेष.