श्री.विठ्ठल रुक्मिणी महाविद्यालयात जागतिक एड्स प्रतिबंधक दिवस मार्गदर्शन

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.3 डिसेंबर) :- 

श्री.विठ्ठल रुक्मिणी महाविद्यालय सवना येथे स्थापन असलेल्या रेड रिबन क्लबच्या वतीने सोमवारी जागतिक एड्स प्रतिबंधक दिवसा निमित्त जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.पंकज चौधरी यांनी केले. त्यांनी रेड रिबन क्लबच्या उद्दिष्टांबद्दल तसेच विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जनजागृतीचे महत्त्व यावर मार्गदर्शक विचार व्यक्त करण्यात आले. ‌ 

  कार्यक्रमात विशेष व्याख्याते म्हणून गजानन गोळेकर (समुपदेशक) ग्रामीण रुग्णालय सवना यांनी एच.आय.व्ही.-एड्स संबंधी माहिती, संसर्गाची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, सुरक्षित वर्तन व समाजातील गैरसमज या बाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत प्रश्नोत्तरांद्वारे शंका निरसन केले.

त्या नंतर ICTC युनिटला भेट देऊन संपूर्ण रुग्णालयीन प्रक्रिया कशी पार पडते याचे प्रात्यक्षिक डॉ. पुंडे मॅडम यांनी दिले. रेड रिबन क्लबच्या माध्यमातून महाविद्यालयात दरवर्षी आरोग्य विषयक विविध उपक्रम, पथनाट्य, जागृती कार्यक्रम व नाटिका घेण्यात येतात. त्याच परंपरेत यावर्षीही हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला.या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालय सवना येथील प्रा.नासिर शेख, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. पल्लवी नरवाडे,तसेच एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते.कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महल्ले यांचे विशेष प्रोत्साहन मिळाले. ज्या मुळे उपक्रम अधिक यशस्वीरीत्या पार पडला.