🔸भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकला लोअर ऊस प्रकल्प
🔹कॅनॉल दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींची लूट; शेतकऱ्यांचा प्रशासनावर रोष
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.13 नोव्हेंबर) :-
महागाव तालुक्यातील वेणी लोअर पुस प्रकल्प हा शेतकऱ्यांना सिंचनासाठी वरदान ठरणार होता. परंतु लघु पाटबंधारे विभागातील अनियमितता, खाबुगिरी आणि प्रचंड प्रमाणातील भ्रष्टाचारा मुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी कुचकामी ठरला आहे.
प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय महागाव शहरातील प्रशासकीय इमारतीमध्ये थाटले आहे. झिरो ते टेन नंबर पर्यंतच्या क्षेत्रात कॅनॉलद्वारे पाणी सोडण्याची व्यवस्था आहे. प्रत्यक्षात मात्र ईजनी व भोसा परिसरातील कॅनॉल जागो जागी फुटलेले, झाडे झुडपे वाढल्याने दर्जाहीन झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या शेतात पाणी वाहून जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे वास्तव आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी दुरुस्तीच्या नावाखाली बोगस बिले काढून कामे दाखविल्याचा शेतकऱ्यांतून आरोप होतो आहे.जील्हा सिंचन विभाग (क्र.४) या मधील काही अधिकाऱ्यांचे ठेकेदारांशी संगनमत असल्याचेही बोलल्या जात आहे.मागील वर्षी जलपर्णी काढण्याच्या कामात सुमारे दीड कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्ष काम केवळ पाच लाखांच्या खर्चात पूर्ण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्या मुळे अधिकाऱ्यांनी निश्चितच ‘हातओले’ केल्याची पंचक्रोशीत चर्चा रंगत आहे. गेल्या दहा ते पंधरा वर्षांत कॅनॉल दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाल्याची शंका व्यक्त होत आहे. आज पर्यंत शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचलेले नाही.परिणामी शासनाच्या कोट्यावधींच्या खर्चाचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही.
सामाजिक कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी या सर्व प्रकरणाचे स्वतंत्र ऑडिट व प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे.







