न्याय न मिळाल्यास अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.5 नोव्हेंबर) :- 

  नागपूर- बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी झालेल्या अवार्ड मध्ये हिवरा (संगम) येथील शेतकऱ्यांची शेती गेलेली आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय महामार्गाचे क्षेत्र अधिग्रहित करतांना शेतातील फक्त 21 आर क्षेत्र अधिग्रहण केल्याचे सीमांकना वरून दिसत आहे. या संबंधी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्याकडे वेळोवेळी विनंती करून सदर बाब संबंधिताच्या लक्षात आणून दिली आहे.

  हिवरा (संगम) येथील शेतकरी शरद देविदासराव कदम यांचे शेत सर्वे नंबर 17/2 (अ ) मधील शेत हिश्यामधून नागपूर- बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी अधिग्रहण करण्यात आली. या राष्ट्रीय महामार्गासाठी झालेल्या अधिग्रहीत क्षेत्र 46 गुंठे अधिग्रहण दाखविले आहे. परंतु प्रत्यक्षात राष्ट्रीय महामार्गाचे क्षेत्र अधिग्रहित करतांना शेतातील फक्त 21 क्षेत्र अधिग्रहित केल्याचे सीमांकनावरून दिसते.

या संदर्भी उपविभागीय अधिकारी उमरखेड सखाराम मुळे यांच्याकडे वेळोवेळी विनंती अर्ज सादर करून न्याय मागणी केली आहे. सदर क्षेत्रफळ दुरुस्तीसाठी 11 जुलै 2018 रोजी शेतकऱ्यांचे सामूहिक नियोजन सादर करून क्षेत्रफळ दुरुस्त करून देण्यासाठी साकडे घालण्यात आले. या संदर्भात पुन्हा मोजणी करून क्षेत्रफळ दुरुस्ती करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय महागाव यांना आदेशित केले होते.

ती प्रक्रिया चालू असतांना उपविभागीय अधिकारी यांना वारंवार विनंती केली असतांना 1नोव्हेंबर 2025 रोजी परस्पर शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता सातबारा वरून 46 आर क्षेत्र अधिग्रहित केल्याचा फेरफार घेतला ही बाब शेतकऱ्यावर अन्याय करणारी ठरत आहे. आपणांस कायम भूमिहीन करण्यासाठी घातलेला हा घाट असल्याचे शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनातून नमूद केले आहे. शेतकऱ्यांवर कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी अन्य कोणतेही साधन नसल्याने सदर शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांवरती उपासमारीची वेळ आली आहे.

उपविभागीय अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील अधिग्रहित केलेले क्षेत्रफळ तातडीने पुनर्मोजणी नुसार सात दिवसात आत दुरुस्ती करावी, अन्यथा आपणास आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागणार असल्याचे 4 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. उपविभागीय अधिकारी उमरखेड यांनी तात्काळ दखल न घेतल्यास प्रसंगी आत्मदहन सारखा मार्गाचा अवलंब करावा लागणार असल्याचे दिलेल्या निवेदनातून शेतकरी शरद कदम यांनी माध्यमा कडे माहिती दिली.