ग्रा.प. माळवागत येथील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण थंड बस्त्यात

🔸गटविकास अधिकारी कदम कलम 39(1) अहवाल पाठवण्यास असमर्थ

 🔹दोषींवर कधी फौजदारी गुन्हे कधी दाखल होणार

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.30 सप्टेंबर) :- ग्रा.प. माळवागत येथील सरपंच सौ.चंचल विनोद जाधव यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) नुसार कार्यवाही करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश दिले. परंतु महागाव गटविकास अधिकारी यांनी अद्याप त्या प्रकरणातील प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला नाही, त्यामुळे कार्यवाही अद्याप प्रस्तावित आहे.

माळवागत येथील ग्रा प.मध्ये अनियमितता झाल्याची तक्रार झाल्याने चौकशी अहवाल प्राप्त झाला. या नंतरही आज पावेतो संबंधितावर कार्यवाही झाली नाही. दोषी असणाऱ्या पदाधिकारी कर्मचाऱ्यावर कार्यवाही व्हावी, या साठी माळवागत येथील सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज चव्हाण यांनी चार महिन्यापूर्वी जिल्हा परिषद यवतमाळ येथे उपोषण केले.

महागाव पंचायत समिती मार्फत या प्रकरणी दोन वेळा चौकशी करण्यात आली. त्या चौकशी अहवालात गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. त्यावरून तक्रारीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी उमरखेड तालुक्यातील अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठित केली. त्या समितीमध्ये गटविकास अधिकारी उमरखेड चौकशी प्रमुख तसेच शाखा अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उमरखेड सदस्य व विस्तार अधिकारी पंचायत समिती उमरखेड सदस्य या कमिटीने ग्रा.प. माळवागत येथे जाऊन चौकशी केली. करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान प्रचंड प्रमाणात अनियमितता झाल्याचे सिद्ध झाले. समितीकडून चौकशी अहवाल सादर करण्यात आला. या मुळे माळवागत ग्रा.प.च्या अनियमिततेत दोषी आढळणाऱ्यावर कार्यवाही करणे अपेक्षित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांनी सरपंच चंचल विनोद जाधव हे दोषी असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याकरता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार प्रस्ताव सात दिवसाच्या आत गटविकास अधिकारी यांनी पाठवायला पाहिजे होता. असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र असताना परंतु राजकीय दबाव पोटी त्यांनी हे प्रकरण दडवून ठेवल्याची शंका तक्रारकर त्यांनी माध्यमाकडे वर्तवली आहे. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ कारवाई न झाल्यास पृथ्वीराज चव्हाण सामाजिक कार्यकर्ता माळवागद हे येत्या काही दिवसात उपोषणाला बसणार असल्याचे कळते. महागाव पंचायत समितीला नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी डी. एल.कदम हे वरिष्ठांच्या आदेशाचे कितपत पालन करतात का ? याकडे तालुक्याचे लक्ष वेधल्या जात आहे.