एस.टी. आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा भव्य मोर्चा

✒️ सौ.सुवर्णा बेले राजुरा Rajura प्रतिनिधी

राजुरा(दि.30 सप्टेंबर) :–  बंजारा समाजाला एस.टी. (अनुसूचित जमाती) प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी भवानी माता मंदिर, राजुरा येथून तहसील कार्यालयापर्यंत हजारो समाजबांधवांचा किलोमीटरभरचा शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तहसील कार्यालयाजवळ झालेल्या सभेत समाज नेत्यांनी आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या.

नेत्यांनी सांगितले की, हैदराबाद गॅझेट 1918 नुसार बंजारा समाज मूळतः आदिवासी असून त्यांचा एस.टी. प्रवर्गात समावेश केला होता. मात्र स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात या समाजाचा एन.टी. प्रवर्गात समावेश झाला; तर आंध्रप्रदेश, तेलंगणा व कर्नाटकात बंजारा समाजाला एस.टी. प्रवर्गाचा दर्जा आहे. त्यामुळे हैदराबाद गॅझेटचा दाखला देत बंजारा समाजाला महाराष्ट्रातही एस.टी. प्रवर्गाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

समाजाच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही वेगळे आरक्षण मागत नाही, तर आमचा घोषित घटनात्मक अधिकार मागत आहोत,” असे ते म्हणाले.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी शेखर महाराज, पोहरा देवी, लखन जाधव, पांडुरंग जाधव, ओम पवार, अजय राठोड, प्रभाकर चव्हाण, दिनेश राठोड, प्रदीप जाधव, आकाश जाधव यांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. शांततेत पार पडलेल्या या मोर्चात समाजातील युवक-युवतींसह ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.