✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.25 सप्टेंबर) :- महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर येथील श्री दत्तात्रेय शिखर संस्थान व श्री अनुसया माता मंदिर परिसरात दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा केला जातो. यंदाही दिनांक २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हा महोत्सव पार पडणार असून यासाठी लाखो भाविक दर्शनासाठी माहूरकडे येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर भाविक भक्तांची होणारी गैरसोय लक्षात घेता श्री दत्त शिखर संस्थान, माहूर यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माहूर आगार प्रमुखांना निवेदन दिले आहे. या निवेदनात महोत्सव काळात एस.टी. बसेस थेट दत्तशिखर गडावर नेण्यात याव्यात, पायथ्याला थांबवू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
संस्थानच्यावतीने सांगण्यात आले की, पूर्वी बससेवा थेट गडापर्यंत सुरू होती. मात्र काही काळापासून ही सेवा फक्त पायथ्यापर्यंतच मर्यादित करण्यात आली आहे. यामुळे वृद्ध, अपंग तसेच महिला भाविकांना गडावर चढताना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. नवरात्र महोत्सवात हजारो भाविक एकत्र जमल्याने ही समस्या आणखी गंभीर बनते.
भाविकांच्या सोयीसाठी संस्थानने परिवहन मंडळासोबत सहकार्य करण्याची तयारीही दर्शवली असून, पुरेशा प्रमाणात बसेसची व्यवस्था करून भक्तांना गडावर सुरक्षितपणे पोहोचविणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनाची प्रत मा. जिल्हाधिकारी नांदेड, मा. विभागीय सचिव म.रा.प.म. नांदेड, मा. सहायक जिल्हाधिकारी किनवट व मा. तहसिलदार माहूर यांना देखील सादर करण्यात आली आहे. यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात प्रशासन व परिवहन मंडळ आवश्यक ती पावले उचलतील, अशी अपेक्षा भाविकांतून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, माहूर हे तीर्थक्षेत्र दरवर्षी नवरात्रात लाखो भाविकांनी गजबजून जाते. रेणुकामाता मंदिर, दत्तशिखर व अनुसया माता मंदिर ही तीर्थक्षेत्रे भाविकांच्या श्रद्धास्थानी असून या तिन्ही ठिकाणी जाण्यासाठी परिवहन सेवेची सोय अत्यावश्यक मानली जाते.
भाविकांच्या म्हणण्यानुसार, “गड चढणे अनेकांना कठीण जाते. एस.टी. बस थेट गडावर गेल्यास मोठा दिलासा मिळेल.” त्यामुळे नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी वेळेवर पूर्ण झाली तर भाविकांना सुखद अनुभव मिळेल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.







