बेशिस्तीमुळे अपघातात वाढ

भारतात होणाऱ्या रस्ते अपघाताबाबत काही दिवसांपूर्वी एक अहवाल प्रसिद्ध झाला. भारतातील रस्ते अपघात २०२३ या नावाने प्रसिद्ध झालेला हा अहवाल जितका धक्कादायक आहे तितकाच तो चिंताजनकही आहे कारण या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त अपघात भारतात होतात असे नमूद करण्यात आले आहेत.

या अहवालानुसार २०२३ या कॅलेंडर वर्षात देशात ४.८० लाख रस्ते अपघात झाले असून त्यात २.८ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्यात दोन तृतीयांश लोक १८ ते ३५ या वयोगतील होते. ही गोष्ट अधिक गंभीर आहे. ज्या तरुणांच्या जोरावर आपण महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहोत त्यांचे असे अकाली मृत्यू क्लेशदायक आहेत. ऐन उमेदीच्या काळात असे हकनाक मरण यावे लागणे हे केवळ दुःखदायकच नाही तर देशातील रस्त्यांच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. भारतात दिवसाला सरासरी पाचशे अपघात होतात आणि त्यात दरवर्षी लाखो लोक मरण पावतात.

भारतात सर्वात जास्त मृत्यू हे रस्ते अपघातात होतात. अमेरिकेनंतर सर्वात जास्त रस्त्यांचे जाळे भारतात आहे. वाहनांची सख्या तर बेसुमार आहे. दरवर्षी त्यात लाखो वाहनांची भर पडते. वाहनांची वाढती संख्या देखील अपघातास कारणीभूत ठरत आहे. भारतातील रस्ते हा तर मोठा विनोदाचा विषय आहे. भारतातील रस्त्याचे जाळे वाढत आहे ही समाधानाची बाब असली तरी आपल्याकडील रस्ते बांधणी सदोष असल्याने अपघात होतात असेही काही जणांचे मत आहे काही वर्षापूर्वी तसा अहवालच आला होता तरीदेखील त्यात सुधारणा होत नाही. रस्ते मग ते महामार्गावरील असोत की ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असते.

खड्ड्यांमुळे सर्वाधिक अपघात होतात असे मानले जाते. आपल्याकडे रस्त्याच्या तुलनेत वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. नागरिकांचा सार्वजनिक वाहन व्यवस्थेवर विश्वास नसल्याने जो तो स्वतःच्या खाजगी वाहनांनी प्रवास करतो. वाहनांची सख्या वाढल्याने वाहतूक कोंडी देखील वाढली. महामार्ग असोत की पुण्यामुंबई सारखे मोठे शहरे असोत सर्वत्र रस्त्यांवर वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या दिसतात. ज्याला त्याला पुढे जायची घाई झालेली असते त्यामुळे वाहतुकीचे नियम न पाळताच गाड्या चालवणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे त्यातूनही अपघात होतात. वाढत्या वाहतुकीला नियंत्रित करणाऱ्या वाहतूक पोलिसांची संख्या देखील अपुरी आहे. याबाबत शासन दरबारी गंभीर विचार झाला पाहिजे.

बहुतांशी अपघात हे मानवी चुकांमुळेच होतात याला कारण आहे वाहन चालकांचा बेशिस्तपणा. वाहन चालक बेजबाबदारपणे वाहन चालवून स्वतःसोबत दुसऱ्यांचा जीवही धोक्यात घालतात. भरधाव वेगात वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, मद्यपान करून वाहन चालवणे, चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वाहतुकीचे नियम न पाळणे या गोष्टी आपल्याकडे सरास होतात. या गोष्टी वाहन चालकांनी टाळल्या तर अपघातांची संख्या निश्चित घटेल. रस्ते अपघातांची संख्या टाळण्यासाठी शासनानेही ठोस धोरण आखले पाहिजे. रस्त्यांवर बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्यांना कडक शिक्षा करायला हवी. शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे देखील याबाबत प्रबोधन केले पाहिजे. 

✒️श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे

९९२२५४६२९५