आर्वी ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय सर्वोत्तम घरकुल पुरस्कार

🔹सरपंच सुरज माथनकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

✒️ सौ. सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी) 

राजुरा (दि.19 सप्टेंबर) :– ग्राम विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण महाआवास अभियान पुरस्कार २०२४-२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण / राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना या योजनेत राजुरा पंचायत समिती तर्फे आर्वी ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय सर्वोत्कृष्ट घरकुल प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारात सन्मानचिन्ह व सन्मानपत्राचा समावेश असून आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला.

        सेवा पंधरवाड्याच्या औचित्याने आयोजित या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तहसीलदार ओमप्रकाश गौड, गटविकास अधिकारी भागवत रेजिवाड, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

        आर्वी ग्रामपंचायतीला मिळालेल्या या यशाबद्दल सरपंच सुरज उर्फ बत्ता माथनकर, उपसरपंच गिरजा मारोती शिवणकर, ग्रामसेवक विठोबा दुर्वे, तसेच ग्रा. पं. सदस्य दिलीप डाखरे, मारोजी आस्मपरिवार, प्रफुल उपरे, अंकुश मस्की, प्रियंका थेरे, विद्या माथनकर, शालू सुधाकर येल्लुरे, मीनाक्षी मालेकर यांनी आनंद व्यक्त केला. तर आर्वी ग्रामपंचायतीच्या या यशाबद्दल तालुक्यातील नागरिक आणि ग्रामस्थांनी सरपंच सुरज माथनकर यांचे अभिनंदन करून भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.