🔸छत्रपती शिवाजी महाराज शिबिरात एनसीएमसी स्मार्टकार्ड अभियान यशस्वी
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.26 मे) :-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबीलीटी कार्ड) स्मार्ट कार्ड अभियानाला महागांव एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कक्षात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महागाव एसटी डेपो अंतर्गत 5 मे 2026 पासून आयोजित करण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज शिबिरात” हे विशेष अभियान राबविण्यात आले आहे.
या अभियानाचे नेतृत्व महागाव पंचायत समितीचे माजी सभापती कॉ.डी.बी. नाईक, एस.टी.महामंडळ वाहतूक नियंत्रक महागाव, बंडूजी पारवेकर यांनी केले. एजंट अहमद खान यांच्या माध्यमातून नागरिकांची नोंदणी प्रक्रिया पार पडली. शिबिरात नव्याने तब्बल 100 स्मार्ट कार्डांची नोंदणी व वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाला अधिक सुलभ, जलद आणि डिजिटल स्वरूप देण्यासाठी महामंडळाने सुरू केलेले हे स्मार्ट कार्ड “टॅप अँड गो” तंत्रज्ञानावर आधारित आहे. या कार्डचा वापर केवळ एस.टी. बस प्रवासा पुरता मर्यादित नसून मेट्रो, लोकल ट्रेन, शहर बस सेवा तसेच खरेदी व पार्किंग शुल्क भरण्या साठीही करता येणार आहे.
या कार्डमुळे वाहकाकडे सुट्ट्या पैशांचा प्रश्न मिटणार आहे. काही सेकंदांत तिकीट मिळत असल्याने प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. महिलांसाठी विविध सवलती, ज्येष्ठ नागरिकांसाठी 65 वर्षांवरील विशेष योजना तसेच आता 12 वर्षे पूर्ण झालेल्या मुलींना देखील या स्मार्ट कार्ड सुविधेचा लाभ घेता येणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महागांव एस.टी. डेपोमध्ये आयोजित या उपक्रमामुळे डिजिटल व्यवहारांना चालना मिळत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आधुनिक सुविधा बाबत जागृती निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विभाग नियंत्रक अमृत कचवे तसेच उमरखेड आगार व्यवस्थापक प्रमोदिनी किनाके यांच्या मार्गदर्शना खाली हा उपक्रम महागांव बस स्थानक येथे यशस्वीरित्या राबविण्यात आला आहे.







