बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या

🔹गोवंश तस्करी वाहनाचा पाठलाग करणाऱ्या तरुणाच्या हत्याने खळबळ

🔸महागांव कडकडीत बंद, जिल्ह्यात संतापाची लाट

✒️शाम बेलगमवार महागाव(Mahagaon तालुका प्रतिनिधी)

महागाव(दि.26 मे) :-

गोवंशाची तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसर हादरला आहे. सुकळी ता. उमरखेड येथे 23 मे रोजी शनिवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडलेल्या ह्या थरारक घटनेने जिल्ह्यात प्रचंड तणाव निर्माण झाला. घडलेल्या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मृत तरुणाचे नाव गजानन मारुती सुरोशे रा. वडद (मुडाणा) असे असून तो बजरंग दलाचा सक्रिय कार्यकर्ता होता. त्याच्या हिंसक मृत्यूमुळे तालुक्यांत शोककळा पसरली आहे. 

    प्राप्त माहिती नुसार यवतमाळ महागाव मार्गाने एका बोलेरो पिकअप वाहनात( क्र. एम. एच. 29/ बी. ई. 8915) मोठ्या प्रमाणात गोवंश भरून कतली साठी उमरखेडच्या दिशेने नेण्यात येत होते. वाहनात 16 ते 17 गोवंश कोंबून नेण्यात येत असल्याचे कळते. नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गा वरील बिजोरा टोल नाक्यावर या वाहनाने संशयास्पद रित्या वेग वाढवला व हुलकावणी दिली. दरम्यान टोल नाक्यावर गोवंश तस्करीवर लक्ष ठेवून असलेले बजरंग दलाचे काही कार्यकर्ते सतर्क झाले. त्यांनी तातडीने वाहनाचा पाठलाग सुरू केला. गजानन सुरोशे यांनीही आपल्या एस क्रॉस( क्र.एम.एच.12/ पी.टी./ 8634) कार मधून संशयित बोललोरोचा पाठलाग केला.

सुकळी गावात सापळा रचून दगड लाकडांनी अमानुष मारहाण 

पाठलाग सुरू असतांना बोलेरो चालकाने वाहन सुकळी गावच्या दिशेने वळविले. सुरोशे यांचे वाहनही मागोमाग गावात शिरले. याचवेळी बोलेरोतील संशयित तस्कर अचानक बाहेर आले आणि त्यांनी गजानन सुरोशे यांच्या वाहनावर मोठ-मोठी दगड आणि लाकडांनी हल्ला चढविला. अचानक झालेल्या या भीषण हल्ल्यात कारची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. या संपूर्ण घटनाक्रमाचे सीसीटीव्ही फुटेज हाती आले असून एकूणच घटनाक्रम काळजाचा ठोका चुकविणारा आहे. दगडफेकीत गजानन सुरोशे गंभीर जखमी झाले. स्थानिक गावकऱ्यांनी त्यांना तातडीने उमरखेड येथील रुग्णालयात हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारासाठी नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 

परिसरात तणाव महागाव बंदची हाक 

या घटनेनंतर उमरखेड, महागांव सह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. बजरंग दलाने या हत्याचा तीव्र निषेध करत महागांव बंदची हक्क दिली. रविवारी सकाळ पासून कार्यकर्त्यांनी महागाव बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनीही या आव्हानाला प्रतिसाद देत बहुतांश व्यापारी प्रतिष्ठानने बंद ठेवली. परिस्थिती चिघळूनये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली व तपासला गती दिली. 

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी विशेष पत्रके रवाना करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. गोवंश तस्करीच्या संशयातून घडलेल्या या खुणामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान गजानन सूरोशे यांच्या हत्याचा निषेध करत दोषींवर कठोर कार्यवाहीची मागणी विविध हिंदुत्ववादी संघटना कडून करण्यात येत आहे. बोलोरो पिकअप वाहन सुकळी येथीलच असल्याची चर्चा आहे.