महागावात शेतकऱ्यांचा ‘हाहाकार मोर्चा’; जिल्हा प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक

🔸जगदीशभाऊ नरवाडे यांनी प्रशासनाला धरले धारेवर; पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचा गळ्यात पोस्टर अडकवून निषेध

✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.22 मे) :-

तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांच्या प्रलंबित मागण्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात महागाव येथे शेतकऱ्यांचा आणि महिलांचा अभूतपूर्व संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. ‘जन आंदोलन आधार संघर्ष समिती’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हाहाकार मोर्चात’ संतप्त शेतकऱ्यांनी आणि महिलांनी जिल्हा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.तळपत्या उन्हाची तमा न बाळगता हजारो नागरिक या मोर्चात सामील झाले होते.

पिक विमा,अवैध दारू विक्री,खतांचा काळाबाजार, पाणंद रस्ते,घरकुल योजना यांसह विविध समस्या घेऊन जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीशभाऊ नरवाडे यांच्या नेतृत्वात शेतकरी,घरकुल लाभार्थी महिला यांनी हाहाकार मोर्चा काढत तहसील कार्यालयावर धडक दिली यावेळी नरवाडे यांनी आपल्या घणाघाती भाषणात जिल्हा प्रशासनावर सडकून टीका केली. “महागाव तालुक्यावर सतत अन्याय केला जात असून प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या निषेधाचे फलक गळ्यात अडकवून प्रशासनाचा तीव्र निषेध केला. तप्त उन्हातही महिला भगिनींचा वाढता सहभाग या मोर्चाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.

यावेळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने आणि सरसकट पीक विमा मंजूर करण्यात यावा, बाजारात मिळणारे बोगस खत, बियाणे आणि औषधांची कृषी विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी,

  ‘लाडकी बहीण’ योजनेचा मोबदला महिलांना तत्काळ आणि विनाअडथळा मिळाला पाहिजे, तालुक्यात ‘गाव तिथे दारूबंदी’ लागू करा, घरकुल योजनांचे प्रश्न सोडवा, पांदण रस्ते तात्काळ तयार करा आणि कलगाव येथील स्मशानभूमीसाठी तातडीने रस्ता उपलब्ध करून द्या.या मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या.यावेळी तहसीलदार गजानन पराते, गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम,पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी आपापल्या विभागाची निवेदने स्वीकारली.

यावेळी या हाहाकार मोर्चात तालुक्यातील अनेक प्रमुख नेते आणि समाजसेवक खांद्याला खांदा लावून उतरले होते. यामध्ये जगदीश नरवाडे, नागोराव पाटील कदम, गोविंदराव देशमुख, संजय गरुड, मंगेश पाटील वानखेडे, स्वप्निल नरवाडे, आकाश चव्हाण अमोल चंदापुरे, अमोल वानखेडे, ओम कुसुंगवार, बापूराव देशमुख, दिलीप सुरोशे, केदार जोशी, दादाराव ठाकरे पंजाब पवार गाडबैले यांच्यासह , सुवर्णा देशमुख, देवकाबाई राठोड मेहजबिन पठाण यांच्यासह विविध गावांतील नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा जाहीर सभेतून देण्यात आला असून, या ‘हाहाकार मोर्चा’ने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.