विद्यार्थ्यांच्या भविष्याशी विश्वासघात”; NEET-UG 2026 पेपर लीक विरोधात भारतीय विद्यार्थी मोर्चाचा तीव्र एल्गार

🔹निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदलांची मागणी

नवी दिल्ली / नागपूर 

NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संताप आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थी मोर्चा यांच्या वतीने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना सविस्तर 12 सूत्री निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे पेपर लीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून शिक्षण व्यवस्थेत पारदर्शक आणि समानताधिष्ठित सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, NEET-UG 2026 परीक्षेतील कथित पेपर लीक हा केवळ परीक्षा गैरव्यवहार नसून देशातील शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता, स्पर्धा परीक्षांची निष्पक्षता आणि सामाजिक न्याय यावर गंभीर प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे. महाराष्ट्रातील नाशिक परिसरातून पोर्टेबल स्कॅनरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका स्कॅन करून PDF स्वरूपात व्हॉट्सअॅप व टेलिग्रामद्वारे प्रसारित करण्यात आल्याचा आरोप विविध माध्यमांतून समोर येत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करण्याची मागणी करत संघटनेने केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. तसेच केवळ Re-NEET घेणे पुरेसे नसून प्रभावित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या तिप्पट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी भूमिकाही संघटनेने स्पष्ट केली.

संघटनेने NTA च्या परीक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करत परीक्षा प्रणालीचे सरकारी नियंत्रणाखाली पुनर्रचना करण्याची मागणी केली आहे. OMR आधारित परीक्षांऐवजी CBT (Computer-Based Test) प्रणाली लागू करण्यावर भर देण्यात आला आहे.

निवेदनात प्रश्नपत्रिका सुरक्षेसाठी अत्याधुनिक यंत्रणा, दोषींवर कठोर कारवाई, परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांशी सन्मानपूर्वक वर्तन, तसेच सामाजिक न्यायाच्या तत्त्वानुसार OBC, SC, ST आणि अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच “वन Neशन, वन एज्युकेशन, वन सिलेबस, वन फीस” धोरण लागू करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.

पेपर लीकमुळे मानसिक तणावाखाली मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत व सरकारी नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास देशभर शांततापूर्ण आंदोलन, सत्याग्रह आणि लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही भारतीय विद्यार्थी मोर्चाने दिला आहे.

यावेळी जयशिल कांबळे प्रदेश अध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा, ऍड रोशना आडे जिल्हाध्यक्षा भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ट, विकास गावंडे, युवराज आडे, राजीव डफाळे, अशोक भोयर, बिमोद मुधाने, मिलिंद बडशे, सुनिल गवई, उत्तम बनसोड, सुरेश फुलमाळी व सज्वल सोनवने उपस्थित होते.