ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेसाठी २३ मार्चला दिल्लीत आंदोलन; जास्तीत जास्त बांधवांनी सहभागी व्हावे – श्रीहरी सातपुते

🔸जंतर-मंतरवर धरणे आंदोलन; ओबीसी हक्कांसाठी देशभरातील संघटना एकवटणार

✒️गुणवंत चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)

चिमूर(दि.12 मार्च) :-

         केंद्र शासनाने देशातील इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) न्याय देण्यासाठी येणाऱ्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी, या प्रमुख मागणीसाठी येत्या २३ मार्च रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे विदर्भ उपाध्यक्ष श्रीहरी सातपुते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

         राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय महासचिव सचिन राजुरकर तसेच ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडणार आहे. देशात लवकरच जनगणना होणार असून ऑक्टोबर २०२६ पासून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये, तर उर्वरित देशात २०२७ पासून जनगणना सुरू होणार असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जनगणना आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार राजपत्रात ३३ प्रश्नांची सूची प्रकाशित करण्यात आली आहे. या सूचीतील १२व्या क्रमांकावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा उल्लेख करण्यात आला असून इतरांसाठी ‘अन्य’ असा शब्द वापरण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये ओबीसींचा स्पष्ट उल्लेख नसल्याने ओबीसी समाजात नाराजी व्यक्त होत आहे.

         मागासवर्गीय ठरविण्याच्या निकषांमध्ये संबंधित जातीतील कुटुंबांची सामाजिक व आर्थिक स्थिती महत्त्वाची मानली जाते. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित केली जाणार असून त्यामध्ये केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व धर्म यांची नोंद होणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असून विदर्भातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीहरी सातपुते विदर्भ उपाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ यांनी केले आहे.

ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या समोर येण्यासाठी स्वतंत्र जनगणना अत्यंत आवश्यक आहे. समाजाच्या हक्कांसाठी दिल्लीतील आंदोलनात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.– श्रीहरी सातपुते