वाकोडी येथील ग्रा.प. कामात बनावट स्वाक्षऱ्या प्रकरण चव्हाट्यावर

🔸चौकशी अहवालात झाली गंभीर अनियमितता उघड

🔹सचिव,सरपंच,अधिकारी तसेच ठेकेदारांवर गुन्हे दाखल होणार

✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.11 मार्च) :-

महागाव पंचायत समिती अंतर्गत वाकोडी येथील ग्रामपंचायतीतील विविध विकास कामांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीतून मंगळवारी पंचायत समितीच्या अहवालात समोर आला. सचिव, सरपंच,संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. वाकोडी येथील तक्रारदार अमजदखान आयुबखान पठाण यांनी दिलेल्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने संपूर्ण ग्रामपंचायतीच्या विकास कामांची चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान काही कामांचे मोजमाप व मूल्यांकन प्रत्यक्ष स्थळाला भेट न देता तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  चौकशी अहवालानुसार मोजमाप पुस्तिकेतील (एमबी) पान क्र. ५७ व ५८ वर नोंदविण्यात आलेले मूल्यांकन संशयास्पद असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्या वरील स्वाक्षऱ्यांची सत्यता तपासण्याची आवश्यकता असून त्या बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. शिवाय,पाच ‘विकास कामपूर्णत्व प्रमाणपत्रात’कनिष्ठ अभियंता, उपअभीयंता आणि गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याची शक्यता चौकशीत पुढे आल्या आहेत.

त्यामुळे या स्वाक्षऱ्यांची तात्काळ पडताळणी करून संबंधित दोषींवरती कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे,निधीचा अपहार करणे किंवा बनावट कागदपत्र तयार करणे हा फौजदारी गुन्हा असल्याने या प्रकरणांत गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचेही चौकशी अहवालात नमूद करण्यात आले.दरम्यान,यापूर्वी पंचायत समिती कार्यालयातून एमबी रेकॉर्ड गायब झाल्याची बाबही समोर आली होती. त्या मुळे या प्रकरणाची गंभीरता अधिक वाढली आहे. चौकशी समितीने 10 मार्च 2026 रोजी आपला अहवाल गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केला असल्याचे कळते. लवकरच संबंधितांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर संबंधितांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनियमिततेतून अपहार झालेली रक्कमही वसूल होण्याची शक्यता असल्याने दोषींची‌आता धावपळ सुरू झाल्याची चर्चा पंचायत समिती स्तरावर होत आहे.