फुलसावंगीत अवैध सावकारावर धाड

🔹सावकार दाम्पत्याच्या घराची झडती; अनेक कागदपत्रे जप्त

✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.11 मार्च) :-

महागांव तालुक्यांतील फुलसावंगी येथील वॉर्ड क्र. २ मधील रहिवासी असलेल्या काटोले दाम्पत्याच्या घरी आज पुसद व महागाव येथील सहायक निबंधकांच्या संयुक्त पथकाने धाड टाकून सखोल झडती घेतली. जवळपास पाच तास चाललेल्या या कार्यवाहीत पथकाने अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असल्याची माहिती समोर आली आहे.

   सततची नापिकी व दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांपैकी अनेकजण अवैध सावकारांच्या जाळ्यात अडकत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. मनमानी व अवाजवी व्याजदरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलल्याची उदाहरणेही समोर आली आहेत.

मात्र काही शेतकरी अन्याया विरोधात आवाज उठवत अवैध सावकारांना आव्हान देत आहेत.याच पार्श्वभूमीवर महागाव तालुक्यांतील वरोडी (नवीन) येथील महिला शेतकरी देवशाला अरविंद कोनपत्रीवार यांनी फुलसावंगी येथील संतोष गणपत काटोले व त्यांच्या पत्नी सविता काटोले यांच्या विरोधात अवैध सावकारी बाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पुसद व महागाव येथील सहायक निबंधकांच्या पथकाने संयुक्तरित्या काटोले दाम्पत्याच्या राहत्या घरी छापा टाकला.छाप्याच्या वेळी संतोष काटोले हे नांदेड येथे असल्याची माहिती मिळाली. त्या नंतर पथकाने घरातील कागदपत्रांची ऑन-कॅमेरा तपासणी सुरू केली. तपासा दरम्यान काही दरवाजे व आलमारीची कुलपे तोडून शोध घेण्यात आल्याची परिसरात चर्चा आहे.सुमारे पाच तास चाललेल्या तपासणीत पथकाने अनेक कागदपत्रांची तपासणी करून आवश्यक 48 दस्तऐवज जप्त केली.

ज्यामध्ये खरेद्या,सौदे चिठ्ठ्या,चेक, लेटरबुक, डायऱ्या, हिशोबाची कागदपत्रे इत्यादी जप्त केले. अंतिम सत्य चौकशीअंती स्पष्ट होईल; मात्र काटोले दाम्पत्याने कर्जाच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांच्या शेती ताब्यात घेतल्याची फुलसांगवी परिसरात सुरू आहे.या कार्यवाहीत पुसद येथील सहायक निबंधक केशव मस्के, महागाव येथील सहायक निबंधक चेतन राठोड, सहाय्यक सहकार अधिकारी ए.ए.काळभोरे, जनार्दन साळवे,अश्वीनी कांबळे, महागाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंबोरे, कैलास मुखाडे,विद्या राठोड, श्रीकांत दुमारे यांचा सहभाग होता.