🔸निकृष्ट काम आढळल्यास काम बंदसह तीव्र आंदोलनाचा इशारा
✒️यवतमाळ(Yavatamal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
यवतमाळ(दि.25 जानेवारी) :-
सावळी ते केळझरा दरम्यान सुरू असलेल्या सुमारे २ किलोमीटर रस्त्याच्या कामासह सावळी ते उमरी १ किलोमीटर रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला, मजबूत व टिकाऊ राहावा, यासाठी सावळी–ईचोरा सर्कलमधील सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करत आक्रमक भूमिका घेतली.
रस्त्याचे काम सुरू असतानाच नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी जागरूक राहणे अत्यावश्यक असून, कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केल्यास रस्ता लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे भविष्यात केवळ तक्रारी करून उपयोग नाही, आताच कामावर लक्ष देणे गरजेचे आहे, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
कार्यकर्त्यांनी संबंधित कंत्राटदार व प्रशासनाला ठाम शब्दांत बजावले की, जर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, हलगर्जीपणाचे किंवा तांत्रिक निकषांना न पाळणारे असल्याचे आढळून आले, तर कोणतीही तडजोड न करता काम बंद आंदोलन करण्यात येईल. तसेच गरज पडल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या पाहणी व पाठपुरावा कार्यक्रमाला भारतीय बेरोजगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष भुवन मुनेश्वर यांच्यासह यावेळी भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा यांच्या कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या विकासकामात दर्जा हीच प्राथमिक अट असून, निकृष्ट कामाला कोणत्याही परिस्थितीत माफी दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.
लोकसहभागातूनच दर्जेदार व टिकाऊ विकास साधता येतो. आजची जागरूकता ही उद्याच्या मजबूत आणि टिकाऊ रस्त्याची खात्री आहे, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी नरेंद्र खरतडे, संतोष भगत, शेषराव मुनेश्वर, मधुकर हटकरे, धम्मानंद स्थूल, आकाश नेवरे, धर्मेंद्र स्थूल, अनिल कटके, अभय बहादे, अविनाश वाघमारे, तुषार वाघमारे, स्वप्निल वाघमारे, विशाल बनकर आदी पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







