✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.23 जानेवारी) :-
वरोरा तालुक्यातील खेमजई येथील सुपुत्र, सशस्त्र सेना दलाच्या ४० बटालियनमध्ये पटना (बिहार) येथे कार्यरत असलेले वीर जवान राहुल गोवर्धन चौधरी यांनी देशसेवेच्या कर्तव्यात आपले प्राण अर्पण केले. २९ डिसेंबर रोजी कर्तव्य बजावत असताना त्यांचा दुर्दैवी अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना पटना येथील पारस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तब्बल २२ दिवस मृत्यूशी झुंज देत असताना २० जानेवारी रोजी त्यांची प्राणज्योत मावळली.
शहीद जवानांचे पार्थिव पटना येथून इंडिगो एअर अँब्युलन्सद्वारे नागपूर येथे आणण्यात आले. नागपूरहून जन्मगावी खेमजईकडे नेत असताना तेमुर्डा, आसाळा, भटाळा आदी गावांमध्ये नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहत वीर जवानाला अश्रूंनी श्रद्धांजली अर्पण केली.
खेमजई येथे त्यांच्या राहत्या घरी काही काळ अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर खेमजई–शेगाव रस्त्यालगत असलेल्या छोटा तलाव परिसरात शासकीय इतमामात वीर जवान राहुल चौधरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय पोलीस बल नागपूर, चंद्रपूर जिल्हा पोलीस दल, सीआरपीएफ जवानांनी हवेत तीन राउंड फायरिंग करून मानवंदना दिली.
अंत्यविधीप्रसंगी वरोरा–भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, तहसीलदार योगेश कौटकर, नायब तहसीलदार, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक संघटना, कन्या विद्यालय खेमजईचे विद्यार्थी, चौधरी परिवार तसेच हजारो नागरिक उपस्थित होते.
सीआरपीएफ जवानांकडून राष्ट्रीय ध्वज तिरंगा चौधरी परिवाराला सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. विशेष बाब म्हणजे शहीद जवानांचे मोठे बंधू राजकुमार चौधरी हे सध्या भारतीय नौदलात कार्यरत आहेत.
शहीद राहुल चौधरी यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, आई-वडील व भाऊ असा आप्त परिवार आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून “राहुल चौधरी अमर रहे”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.







