✒️गुणवंत चटपकार चिमूर(Chimur तालुका प्रतिनिधी)
चिमूर(दि.20 जानेवारी) :-
वाढदिवस म्हणजे केवळ केक कापण्याचा क्षण नसून, तो समाजातील दुर्बल घटकांच्या आयुष्यात आनंद पेरण्याचा दिवस ठरू शकतो, याचे जिवंत उदाहरण राष्ट्रीय ओबीसी महासंघ महिला आघाडीच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षा तथा माजी पंचायत समिती सदस्या भावना संजय बावनकर यांनी दाखवून दिले.
भावना बावनकर यांचा वाढदिवस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मूकबधिर विद्यालय, वडाळा पैकु (चिमूर) येथे अत्यंत भावनिक आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील मूकबधिर विद्यार्थ्यांना पेपर पॅड व मिठाईचे वाटप करण्यात आले. या छोट्याशा पण मनापासून केलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू आणि डोळ्यांत दिसलेले आनंदाश्रू उपस्थितांचे मन हेलावून टाकणारे होते. शब्द न बोलता व्यक्त होणारा तो आनंद, माणुसकीची खरी भाषा बोलून गेला.
दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी भावना बावनकर यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. कार्यक्रम साधेपणाने, पण भावनांनी ओथंबलेला असा पार पडला.







