आरोग्य विभागातील रुग्णवाहिकेसह. विविध समस्या तातडीने सोडवा अन्यथा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फे मोठा जन आंदोलन उभारण्यात येईल

🔹गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसची निवेदनातून जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

✒️ महेंद्र लटारे गडचिरोली(Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.19 जानेवारी) :- 

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी व दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, मूल, ब्रह्मपुरी, नागभीड इत्यादी तालुक्यांमधून दररोज मोठ्या प्रमाणावर गंभीर रुग्ण उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होत असतात. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयावर रुग्णांचा ताण मोठ्या प्रमाणात आहे.

दररोज अपघातांमुळे गंभीर जखमी रुग्ण दाखल होत असून अशा रुग्णांना तातडीने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करणे अत्यावश्यक ठरते. मात्र 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे गंभीर रुग्णांच्या रेफर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर विलंब होत आहे. परिणामी काही प्रसंगी रुग्णांचा उपचारादरम्यान अथवा प्रवासातच मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत.

सद्यस्थितीत गडचिरोली जिल्ह्यात 102 व 108 क्रमांकाच्या एकूण 55 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी केवळ 10 रुग्णवाहिका या 108 क्रमांकाच्या आहेत. यामधील दोन रुग्णवाहिका जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी व एक रुग्णवाहिका महिला व बाल रुग्णालयासाठी राखीव आहे. उर्वरित सात रुग्णवाहिका तालुकास्तरावरील रुग्णालयांमध्ये रुग्ण रेफरसाठी वापरण्यात येतात. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका अत्यंत अपुरी पडत आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असूनसुद्धा जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली दिसून येत आहे. रुग्णवाहिकांची कमतरता व इतर आरोग्यविषयक समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

तरी गडचिरोली जिल्ह्यात तातडीने 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात यावी व आरोग्य सेवेशी संबंधित सर्व समस्या त्वरित सोडविण्यात याव्यात, ही विनंती. अन्यथा गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

संबंधित या विषयाचे निवेदन गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फे देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड विश्वजीत मारोतराव कोवासे, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक नंदू कायरकर, नंदू वाईलकर, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोडघरे, काँग्रेसचे जिल्हा महासचिव नदीम नाथानी, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, जितू पाटील मुनघाटे, अभिजीत घाईत, चामोर्शी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमानंद गोंगले, अनिकेत राऊत, उपस्थित होते.