✒️ गुणवंत चटपकार चिमूर (Chimur तालुका प्रतिनिधी)
चिमूर(दि.17 जानेवारी) :-
चिमूर बसस्थानक परिसरातील झाडाला फाशी घेऊन 38 वर्षीय बसस्थानक कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृतकाची ओळख सुधीर माणिक भिलकर (वय 38) अशी असून ते चिमूर बस आगारात कार्यरत होते. ही घटना सकाळी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान घडली.
वरोरा येथून चिमूरकडे येणारी एस.टी. बस बसस्थानकाच्या गेटमधून आत येताच, बसमधील विद्यार्थ्यांना खिडकीतून झाडावर लटकलेला मृतदेह दिसला. विद्यार्थ्यांनी तत्काळ ही माहिती एस.टी. कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी चिमूर पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे पाठवला.
या वेळी चिमूर आगारातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस ताफा रुग्णालयात उपस्थित होता. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मृतकाच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत.







