आश्रमशाळा आमणी (बु.) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संपन्न

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव (दि.4 जानेवारी) :- 

प्रियदर्शनी शिक्षण संस्था संचालित- टी.जी.देशमुख प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा तथा वनमालाताई राठोड कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आमनी (बु) ता. महागाव,जि.यवतमाळ येथे दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची १९५ वी जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ शिक्षिका अंजली बोंपीलवार यांनी भूषविले.प्रमुख पाहुणे म्हणून मंजुषा गादेवार,निवेदिता भरकाडे,कांता चव्हाण, डिंपल जगताप व शरयू गवळी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.यावेळी मुख्याध्यापक जय वानखेडे, राजु कावडे प्रा.विनोद राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यानंतर वर्ग पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर आधारित विविध भाषणे व गीत सादरीकरण करून त्यांच्या विचारांचा जागर केला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कुमारी आदिती अरुण राऊत या विद्यार्थिनीने ‘मी सावित्री बोलते’ या विषयावरील प्रभावी भाषण हे विशेष आकर्षण ठरले.सावित्रीबाईंच्या वेशभूषेत सादर केलेल्या या भाषणातून “माझी जयंती साजरी करण्यापेक्षा माझे विचार स्त्रियांनी अंमलात आणावेत” हा संदेश तिने ठामपणे मांडला. तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने मान्यवर व विद्यार्थी भारावून गेले व याबद्दल तिला विशेष प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात अंजली बोंपीलवार यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वाभिमान, समान हक्क व आत्मनिर्भरतेची वाट कशी दाखवली,यावर सविस्तर मार्गदर्शन केले.आजच्या काळात केवळ जयंती साजरी न करता सावित्रीबाईंचे विचार आचरणात आणणे हीच खरी आदरांजली असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्याध्यापक जय वानखेडे व राजु कावडे यांनी विद्यार्थ्यांना स्त्री शिक्षणाचे सामाजिक व शैक्षणिक महत्त्व पटवून दिले. तर विनोद राठोड यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासोबतच दिनदुबळ्या समाजाच्या उन्नतीसाठी व सामाजिक समानतेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी सोपान जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन निकिता कांबळे व पूजा राठोड यांनी प्रभावीपणे पार पाडले.

या कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता अकरावीतील विद्यार्थ्यांनी केले त्यास सौ.डिंपल जगताप, प्रा.पवन जोशी व प्रा.अविनाश निकम, विरेश्वर सूर्यवंशी, भास्कर शिंदे, रविंद्र राठोड, आढाव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे छायाचित्रण प्रकाश येळणे, ज्ञानेश्वर काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पूनम राठोड या विद्यार्थिनीने केले.

या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्त्री शिक्षण,सामाजिक समता व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांबाबत जागृती निर्माण झाली.