✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
ज्या समाजाने स्त्रीला मौनाची शिस्त शिकवली, त्या समाजात सावित्रीबाई फुले बोलल्या. ज्या काळात शिक्षण पाप मानलं गेलं, त्या काळात त्यांनी पुस्तक हातात घेतलं. आणि म्हणूनच सावित्रीबाई केवळ एक शिक्षिका नव्हत्या, त्या एक जिवंत प्रश्न होत्या. रस्त्यावरून जाताना शेण, दगड, शिव्या अंगावर झेलत त्यांनी शाळेचा उंबरठा ओलांडला. प्रत्येक अपमान हा त्यांच्यासाठी मागे फिरण्याचं कारण नव्हतं, तर पुढे जाण्याची पुष्टी होती. कारण सावित्रीबाईंना माहीत होतं. अज्ञान हीच खरी गुलामगिरी आहे, आणि शिक्षण हाच तिचा एकमेव प्रतिकार.
सावित्रीबाईंनी स्त्रीला फक्त अक्षर ओळख शिकवली नाही; त्यांनी तिला स्वतःची ओळख दिली. “विचार करणारी स्त्री” ही त्या काळातील सर्वात मोठी भीती होती. कारण प्रश्न विचारणारी स्त्री केवळ स्वतःचं आयुष्य बदलत नाही — ती संपूर्ण व्यवस्थेला हादरवते. त्यांचा लढा केवळ स्त्रीपुरता मर्यादित नव्हता. शूद्र-अतिशूद्र, विधवा, दलित, वंचित, ज्यांना समाजाने कायम अंधारात ठेवलं, त्यांच्यासाठी त्यांनी शिक्षणाचं दार उघडलं. त्यामुळेच सावित्रीबाईंचा संघर्ष हा शिक्षणाचा नव्हे, तर समतेचा होता. आजही काही जण सावित्रीबाईंचा विचार “तेव्हाचा काळ वेगळा होता” असं म्हणून बाजूला सारतात. पण अन्यायाला काळाचं समर्थन नसतं. सावित्रीबाई भूतकाळात अडकलेल्या नाहीत; त्या आजही जिवंत आहेत. प्रत्येक प्रश्नात, प्रत्येक नकारात, प्रत्येक बंडात.
सावित्रीबाई फुले यांना अभिवादन म्हणजे फुलं वाहणं नव्हे. जोपर्यंत मुलगी शिकते पण घाबरते, स्त्री बोलते पण दाबली जाते, आणि प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प बसवलं जातं तोपर्यंत सावित्रीबाईंची लढाई सुरूच राहील.
भारतीय समाज हा केवळ अन्यायी नाही, तो कृतघ्न, भित्रा आणि आत्मविस्मृतीत बुडालेला समाज आहे. आणि या समाजातील सर्वात दुर्दैवी घटक म्हणजे स्वतःच्या मुक्तीवर थुंकणारी भारतीय स्त्री!
आणि शोकांतिका अशी आहे की जिने हजारो वर्षांची ज्ञानबंदी फोडली, जिने “स्त्री म्हणजे पायातील जोडा” या मनुवादी व्यवस्थेला उघडं पाडलं, जिने दगड, शेण, शिव्या, बहिष्कार, हल्ले सहन करूनही शाळा उघडल्या त्या सावित्रीमाई फुलेंना आजही या देशातील बहुतांश स्त्री आपली आई मानायला तयार नाही. ही विस्मृती नाही. ही जाणीवपूर्वक केलेली गद्दारी आहे.
आज स्त्रीला व्यक्ती म्हणून जे काही अधिकार मिळाले आहेत, ते ना देवांनी दिले, ना धर्मग्रंथांनी. ते सावित्री–जोतिबा–शिवबा–भिमबा यांच्या संघर्षातून मिळाले आहेत. तरीही आजची स्त्री मनुस्मृतीच्या पायरीवर माथा टेकवते, संविधानाकडे पाठ फिरवते आणि स्वतःच्या शत्रूंना गुरू मानते. बलात्काराच्या आरोपींच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या स्त्रिया, स्त्रीदेहाला वस्तू मानणाऱ्या बाबांच्या पाया पडणाऱ्या स्त्रिया, मनुवादी व्यवस्थेला “संस्कृती” म्हणत वाचवणाऱ्या स्त्रिया या केवळ भोळ्या नाहीत. या सावित्रीमाईंच्या कबरीवर थुंकणाऱ्या मानसिकतेच्या प्रतिनिधी आहेत.
सावित्रीमाईंचं ध्येय स्त्रीला शिकलेली पण गुलाम बनवण्याचं नव्हतं. त्यांना डिग्रीधारक शेळ्या नको होत्या, त्यांना विचार करणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या, गरज पडल्यास समाजाच्या छातीत लाथ मारणाऱ्या स्त्रिया हव्या होत्या.
म्हणून त्यांनी केवळ शाळा उघडल्या नाहीत तर त्यांनी मेंदूत स्फोट घडवणारी विचारांची अणुभट्टी पेटवली. आज त्या अणुभट्टीतून तयार झालेल्या स्त्रिया प्रशासनात आहेत, न्यायालयात आहेत, संसदेत आहेत, पण त्या तिथे क्रांतिकारक नाहीत, त्या तिथे शोभेच्या बाहुल्या आहेत. क्रांतिमाईंच्या लाभार्थी सर्वत्र आहेत, पण ज्यांना गुरगुरणं माहीत नाही, ज्यांना प्रतिकार माहीत नाही, ज्यांना मनुवादाच्या मुळावर घाव घालण्याची हिंमत नाही. आजची स्त्री धर्माचं जू गळ्यात घालून उभी आहे, व्रतवैकल्य अन् पोथीपुराणांच्या साखळदंडात स्वतःला अडकवून घेते आहे, आणि तरीही स्वतःला “स्वतंत्र” म्हणवते आहे! ही इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक आहे.
सावित्रीमाईंनी जोतिबांच्या पुढे जाऊन क्रांतीची ज्वाला उंचावली, पण ती ज्वाला पेलण्याची कुवत आजच्या स्त्रीकडे नाही. कारण क्रांतीसाठी शिक्षण पुरेसं नसतं. कृतज्ञता, वैचारिक प्रामाणिकपणा आणि बंडखोरीही लागते.
साऊ, तू समाजजीवनातील दुर्गंधी दूर करण्यासाठी एकटी उभी राहिलीस. आजही त्या दुर्गंधीत जगणाऱ्यांना तुझं नाव ऐकून मळमळते.
क्रांती नुसती बहुमताने होत नाही, ती जागृत मेंदूंनी घडवली जाते. म्हणूनच, इतिहासाशी प्रामाणिक असलेल्या प्रत्येक ताठ कण्याच्या माणसाकडून क्रांतिज्योती सावित्रीमायीस
विनम्र अभिवादन !
राहुलभाऊ भांडेकर जिल्हाध्यक्ष ओबीसी युवा महासंघ गडचिरोली








