विदेशी पक्ष्यांच्या आगमनाने जलाशय परिसरात वाढला किलबिलाट

✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.3 जानेवारी) :- 

हिवाळा सुरू होताच सातासमुद्रापार हजारो किलोमीटरचा प्रवास करून परदेशी पाहुणे गडचिरोली जिल्ह्यातील विविध जलाशयांवर दाखल झाले आहेत. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीत यंदा थंडीचे आगमन उशिरा झाल्याने या विदेशी पक्ष्यांचे आगमनही काहीसे विलंबाने झाले.

मात्र आता जिल्ह्यातील विस्तीर्ण पाणवठ्यांवर या परदेशी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला असून, निसर्गप्रेमी व पक्षी निरीक्षकांसाठी ही एक पर्वणी ठरत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मालगुजारी तलावांची संख्या मोठी असून सिरोंचा, चामोर्शी, मुलचेरा, एटापली आणि आरमोरी तालुक्यांतील मोठ्या आकाराच्या तलावांमध्ये हे विदेशी पक्षी मोठ्या संख्येने विसावतात. त्यांच्या आगमनामुळे जिल्ह्यातील निसर्गसौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.