✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.26 डिसेंबर) :-
फुले–शाहू–आंबेडकरांचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा, सामान्य माणसाचा आधारस्तंभ, संघर्षातून नेतृत्व घडवणारा मित्र डॉ. प्रशांत विघे—समता, न्याय आणि माणुसकीचा वारसा जपणाऱ्या या जिद्दी व्यक्तिमत्त्वाला २६ डिसेंबरच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, त्यानिमित्ताने लेख लिहिण्याचा प्रपंच !
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ विचार दिले नाहीत, तर माणूस उभा करण्याची प्रक्रिया समाजाला दिली. अन्यायग्रस्त, वंचित, उपेक्षित माणसाच्या पाठीशी उभे राहून त्याला आत्मसन्मानाने जगायला शिकवणे—हा या त्रयीचा खरा वारसा. आजच्या काळात हा वारसा केवळ भाषणात नाही, तर कृतीतून जपणारी माणसे फारच दुर्मिळ झाली आहेत. अशाच दुर्मिळ रसायनांपैकी एक नाव म्हणजे प्रा. डॉ. प्रशांत विघे.
एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा माणूस, संघर्षाला घाबरला नाही. उलट, संघर्षालाच आपला शिक्षक मानत पुढे गेला. ग्रामीण भागातील वास्तव, शेतकऱ्याच्या वेदना, शिक्षणातील मर्यादा, सामाजिक अन्याय—हे सर्व त्यांनी अनुभवले. पण या अनुभवांनी त्यांना थांबवले नाही; उलट अधिक सजग, अधिक संवेदनशील आणि अधिक कणखर बनवले.
स्वतःच्या कष्टावर, बुद्धिमत्तेवर आणि प्रामाणिकपणावर शैक्षणिक क्षेत्रातील उच्च पातळी गाठणारा हा व्यक्ती आज केवळ एक प्राध्यापक नाही, तर एक विचारप्रवाह बनला आहे. “काम सांगा” ही त्यांची ओळख आहे. समोरचा कोण आहे, तो कोणत्या गटाचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या विचारसरणीचा आहे—हे प्रश्न त्यांच्या कामाच्या आड कधीच आले नाहीत. माणूस आणि प्रश्न महत्त्वाचा; गट-तट नव्हे—हीच त्यांची भूमिका.
याच निर्भय, निष्पक्ष आणि प्रामाणिक भूमिकेमुळे अमरावती विद्यापीठाच्या परिक्षेत्रात, कोणत्याही राजकीय पुढाऱ्याच्या पाठबळाशिवाय, केवळ जनाधाराच्या बळावर ते नुटा संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांच्यानंतर प्रचंड मतांनी निवडून आले. ही निवडणूक केवळ पदाची नव्हती; ती विश्वासाची, कामगिरीची आणि चारित्र्याची पावती होती.
विद्यार्थी जीवनापासूनच सामाजिक चळवळीचा अंग असलेले डॉ. प्रशांत विघे यांनी सहकार्याचा दयाभाव जपला. लहान मुलांपासून ते ८० वर्षांच्या निवृत्त शिक्षकांपर्यंत त्यांनी माणसं जोडली. कुणालाही ‘तू कोण आहेस?’ असा प्रश्न न विचारता, ‘तुला काय हवं आहे?’ हा प्रश्न त्यांनी विचारला. त्यामुळे त्यांचा जनाधार वाढला, परीघ विस्तारला आणि आज अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत अशी एकही तालुका-संस्था नाही, जिथे “प्रशांत विघे” हे नाव ओळखीचं नाही.
ते कोणत्याही अधिकाऱ्याला चुकीचं काम सांगत नाहीत; पण योग्य, विधायक आणि लोकहिताचं काम होईपर्यंत थांबतही नाहीत.हा त्यांचा स्वभाव आहे. संयम, शिस्त आणि ठामपणा यांचा हा दुर्मिळ संगम आहे. त्यामुळेच प्रशासनही त्यांना गंभीरतेने ऐकते आणि सामान्य माणसालाही त्यांच्यात आपला आवाज दिसतो.
तरुणांमध्ये आश्वासकता निर्माण करणारे, नेतृत्व करण्याची क्षमता असलेले, लोकांना सोबत घेऊन चालणारे हे व्यक्तिमत्त्व आज शैक्षणिक क्षेत्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे. नेतृत्व म्हणजे आदेश नव्हे; नेतृत्व म्हणजे जबाबदारी हे त्यांनी आपल्या वर्तनातून सिद्ध केले आहे.
विविध आंदोलनांच्या माध्यमातून जनतेसाठी लढणारा, जनसामान्यांचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. विशेषतः जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी गेली दहा वर्षे त्यांनी सातत्याने संघर्ष केला. रस्त्यावर उतरून, निवेदनं देऊन, चर्चांमध्ये सहभाग घेऊन अहोरात्र प्रयत्न करणारा हा माणूस कधीही थकला नाही. कारण त्यांच्यासाठी प्रश्न केवळ आर्थिक नव्हता; तो न्यायाचा आणि सन्मानाचा होता.
आज समाजातील तळागाळातला माणूस असो, शिक्षक असो, कर्मचारी असो किंवा विद्यार्थी—सर्वांना आधार देणारा, कोणताही गाजावाजा न करता मदत करणारा असा हा माणूस आहे. “हा आपला माणूस आहे” अशी भावना निर्माण करणं हे सहज साध्य होत नाही; ती वर्षानुवर्षांच्या प्रामाणिक सेवेने निर्माण होते. आणि ती भावना आज पाचही जिल्ह्यांत डॉ. प्रशांत विघे यांच्याबद्दल दिसते.
फुले–शाहू–आंबेडकरांचा वारसा म्हणजे माणूस उभा करणे. त्याच्या पाठीशी उभे राहणे. त्याला न्याय मिळवून देणे. डॉ. प्रशांत विघे हे केवळ त्या वारशाचे वाचक नाहीत, तर वाहक आहेत. म्हणूनच ते केवळ एक व्यक्ती नाहीत—ते एक आधारस्तंभ आहेत. आणि समाजाला आज अशाच आधारस्तंभांची गरज आहे.
डॉ. व्हि पी कदम.
गणित विभाग प्रमुख गोपिकाबाई गावंडे महाविद्यालय उमरखेड जिल्हा यवतमाळ







