आमणी( बु.) ग्रा. वि.सोसायटीत अपात्र कर्जदाराकडून बँक प्रतिनिधी साठी निवड

🔸थकीत कर्जदाराला बँक प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आल्याचा गंभीर आरोप

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.26 डिसेंबर) :- 

महागाव तालुक्यांतील आमणी ग्राम विविध सहकारी सोसायटीत नियमबाह्य आणि कायदा विरोधी कारभार उघडकीस आला आहे. सोसायटीच्या सचिवाने बँक प्रतिनिधी निवडणुकीपूर्वी थकीत कर्जदार सभासदाकडून चेक घेऊन कर्ज नसल्याचे भासवले. मात्र प्रत्यक्षात कर्जाची रक्कम दुसऱ्या दिवशी संबंधित खात्यात जमा करण्यात आल्याचे तक्रारीतून स्पष्ट झाले आहे. ज्यावेळी सदर सभासद बँक प्रतिनिधी पदासाठी उभा होता, त्या वेळी तो कायद्याने अपात्र असतांना सचिवाने हा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

   या शिवाय आमणी( बु.) ग्राम विविध कार्यकारी सोसायटीतील काही संचालकांनी स्वतः कर्जदार असतांनाही त्यांनी बँक प्रतिनिधी निवडणुकीत मतदान केले. तसेच थकीत संचालकालाच बँक प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणी निलेश चिंचोळकर यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ तसेच सहकार अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

सहकार कायद्यानुसार संस्थेचा थकीत कर्जदार संचालक होऊ शकत नाही. आणि तो अपात्र ठरतो, असे असतांनाही अपात्र संचालकांनी मतदान करून नियमबाह्य व बेकायदेशीर बँक प्रतिनिधीची निवड केल्यामुळे हा प्रकार गंभीर कायदा विरोधी ठरतो, असा तक्रारीतून आरोप करण्यात आला. दरम्यान तालुक्यामध्ये यापूर्वी दोन ते तीन सहकारी संस्थेत अशीच परिस्थिती असल्याची माहिती समोर आल्यानंतर सहाय्यक निबंध पुसद यांनी संबंधित बँक प्रतिनिधी पाठविणाऱ्या संस्थातील सर्व संचालक थकीत आहेत का? या बाबत चौकशी सुरू केल्याचे कळते.या संदर्भी माहिती देतांना सहकार अधिकारी पिंपळखेडे श्रेणी1 यांनी सांगितले की, थकीत संचालक सहकारी संस्थेचा संचालक राहू शकत नाही, अशा अपात्र संचालकांना प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार नाही. त्यामुळे दोन ते तीन सोसायटी विरोधात तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्या शिवाय बँक प्रतिनिधी पाठविण्यात येणार नाही या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय पुढार्‍यांची धावपळ सुरू झाली असून सहकार क्षेत्रातील या गंभीर गैरप्रकारामुळे राजकीय व प्रशासकीय यंत्रणेचे याकडे लक्ष लागले आहे.