🔸अनेक कुटुंबीयांचे आता घराचे स्वप्न होणार साकार
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.16 डिसेंबर) :-
जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी महागाव तालुक्यातील आमणी येथील 76 कुटुंबियांना घरकुला साठी मालकी हक्काची जमीन उपलब्ध करून दिली. घरकुल योजने अंतर्गत गरजू नागरिकांना हक्काचे घर मिळावे या साठी जमीन मालक जगदीश उत्तमराव नरवाडे यांच्या सामाजिक पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण उपक्रम 14 डिसेंबर रोजी राबविण्यात आला.
गावातील जवळपास 76 बेघर कुटुंबीयांना मालकीची जमीन उपलब्ध नव्हती. त्यामुळे गरजू लाभार्थींना आपले हक्काचे घरकुल असावे या उदात्त हेतूने कुटुंबांना खरेदीखत, सातबारा उतारे देऊन जमीन त्यांच्या नावावर मालकी हक्काने करण्यात आली आहे. सदरील जागेचे रविवारी एका छोटेखानी कार्यक्रमा द्वारे उत्तमराव शंकरराव नरवाडे (बिटरगांवकर) नगर या नावाने नामकरण करण्यात आले.
या उपक्रमासाठी तहसीलदार अभय मस्के, गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम,तलाठी सीमा कदम,सरपंच सुनीता राठोड,शंकर चव्हाण, बाबुसिंग राठोड, गजानन गायकवाड, दादाराव चवरे, उत्तमपुरी यांचे यावेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या समन्वयामुळे ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली.घरकुलासाठी जमीन नसल्यामुळे अनेक वर्षांपासून वंचित असलेल्या कुटुंबांचा प्रश्न यामुळे सुटला. आता शासनाच्या घरकुल योजनेचा थेट लाभ घेण्याचा मार्ग मोकळा झाला.अनेकांच्या जीवनात सुरक्षितता,स्थैर्य,आत्मसन्मान निर्माण झाला. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. शासनाला सहकार्य केल्याबद्दल महागाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दत्तात्रय कदम यांनी जगदीश जगदीश नरवाडे यांचा प्रसंगी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत जमीन मालक सिंधुताई उत्तमराव नरवाडे, जगदीश नरवाडे,रसिका जगदीश नरवाडे यांचा आमणी ग्रामपंचायच्या वतीने कपडेरूपी आहेर देऊन सत्कार करीत आभार मानले.
(जीवनात येऊन आपणांस समाजाचे काही देणं लागते. या भावनेतून माझ्या वडिलांनी 30 वर्षा अगोदर लोकांना राहण्या साठी दिलेली जागा त्यांच्या नावावर सातबारा करून गाव नमुना आठ झाल्याने आता सर्वांना घरकुल योजना मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला. अडीच एकर जमीन ही प्रॉपर्टी मधून कमी झाली. सर्वांना घरकुलाचा लाभ मिळत आहे, त्याचा आनंद मला होत आहे.)…जगदीश नरवाडे, संस्थापक अध्यक्ष, जन आंदोलन आधार संघर्ष समिती







