✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.16 डिसेंबर) :-
कोणत्याही क्षेत्रात काम करतांना विशिष्ट उद्दिष्टे ठेवून, प्रयत्नांची पराकाष्टा केल्यास स्वतःची व समाजातील इतरांचीही स्वप्न पूर्ण करण्यात मदत होते, असे भावनिक गौरवोद्गार डॉ.संजय भोयर उपप्राचार्य व विभागप्रमुख गणित, फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद द्वारे सोमवारी घेण्यात आलेल्या सत्कार समारंभात डॉ. अविनाश वानखडे, बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय यांनी व्यक्त केले.
स्वतः यशाचा शिखर गाठलेला असताना इतरांना तो गाठण्यासाठी मदतीचा आदर्शपथ निर्माण करणे, म्हणजेच जगण्यातील समाधानाची पूर्तता आहे, असेही ते पुढे म्हणाले. डॉ. संजय भोयर यांच्या मार्गदर्शनात तीन संशोधक विद्यार्थ्यांना एकदाच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने गणित विषयात आचार्य पदवीने सन्मानित केले.
गणिता सारखा कठीण विषयही अगदी सहजतेने हाताळता येतो याची प्रचीतीच डॉ. संजय भोयर यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत एकूण सहा विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी प्राप्त केली आहे. चार संशोधकांचे कार्य प्रगतीपथावर आहे.डॉ. संजय भोयर यांच्या नावे पंधरा पेटंट असून त्यांची प्रकाशित झालेली चाळीस पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. त्यांनी आत्तापर्यंत विद्यापीठातील विविध समित्यांवर प्रतिनिधित्व केले असून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध शोधपेपर प्रकाशित केले आहेत. त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील अथक कार्याची दखल म्हणून त्यांचा बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात डॉ.अविनाश वानखडे यांच्या हस्ते15 डिसेंबर रोजी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना त्यांनी बाबासाहेब नाईक महाविद्यालयाचे व व्यवस्थापनेचे आभार मानत, ही कौतुकाची थाप त्यांना अविरत शैक्षणिक कार्य करण्यास मदत व प्रोत्साहित करेल व यापुढेही संस्थेच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलण्या संबंधी आश्वासित केले. या सत्कार प्रसंगी विभाग प्रमुख प्रा.रुचिर गोडबोले, विभाग प्रमुख डॉ. सुरेश आसोले, प्रा.प्रदीप दुधाट, डॉ.कैलास बोरगडे उपस्थित होते.







