🔸सहकारी सुतगिरणीतील कार्यकारी संचालकावर गंभीर आरोप
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.13 डिसेंबर) :-
यवतमाळ जिल्ह्यातील बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सुतगिरणी, पिंपळगाव (कान्हा) येथील कार्यकारी संचालक यांनी सेवेत असतानाच नियमबाह्य पद्धतीने उपदानाची रक्कम उचलून ती पत्नीच्या नावे घर खरेदीसाठी वापरल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी व शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदार पंजाबराव रामराव देशमुख (रा. पूसद) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुतगिरणीचे कार्यकारी संचालक एम. आय. पातरी यांनी सन २०२२ मध्ये सेवेत असतानाच उपदानाची रक्कम बेकायदेशीररित्या उचलली. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ३६ व ७३ तसेच संस्थेच्या उपविधीतील तरतूद क्रमांक ३५ चा भंग करून ही रक्कम वापरून पुसद येथे त्यांच्या पत्नी नाम रोशन बानू मोहम्मदरफी पातरी यांच्या नावाने सुमारे ३४ लाख रुपये किमतीचे पक्के घर खरेदी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाबाबत २६ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या सुतगिरणीच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला असता, संस्थेच्या अध्यक्षांनी “संबंधित अधिकाऱ्यांचा मुलगा पुढील वैद्यकीय शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून विशेष बाब म्हणून उपदान देण्यात आले,” असे लेखी उत्तर दिल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. मात्र हे उत्तर पूर्णतः खोटे व कायद्याला धरून नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर तक्रारदारांनी यवतमाळ येथील शासकीय कामगार अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. कामगार अधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाने कायद्याचा भंग केल्याचे नमूद करत संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची व फौजदारी कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले. तथापि, आदेश देऊनही सुतगिरणी व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.
या संपूर्ण प्रकरणामुळे सहकारी संस्थांतील कारभाराच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित कार्यकारी संचालकांवर तात्काळ फौजदारी व विभागीय कारवाई करून त्यांना पदावरून दूर करण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
या प्रकरणाशी संबंधित खरेदी खताची प्रत तसेच कामगार अधिकाऱ्यांनी सुतगिरणीला दिलेले पत्र उपलब्ध असून, यामुळे आरोपांना अधिक बळ मिळाले आहे.







