✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.8 डिसेंबर) :-
समाजाचा घटक म्हणून समाजात वावरताना प्रत्येकाने कायद्याचे पालन करणे समाज स्वास्थ्यासाठी अत्यंत गरजेचे असल्याचे मत,आयपीएस हर्षवर्धन बी.जे.एसडीपीओ,पुसद यांनी “भारतीय न्याय संहिता” या कार्यक्रमा निमित्त दि.६ डिसेंबर २०२५रोजी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यां सोबत संवाद साधतांना व्यक्त केले.
समाजात विविध प्रकारचे घडणारे गुन्हे व त्या मुळे विस्कळीत होणारी कुटुंबातील आणि समाजातील सामाजिक विन उसवत असल्याचे विदारक चित्र त्यांनी उदाहरणा सहित मांडले. पण गुन्हे घडूच नयेत व त्या साठीची जागरूकता समाजात निर्माण होण्यास विद्यार्थ्यांनी स्वतः व समाजातील प्रत्येक घटकाने कायद्याचे पालन करावे,असे आव्हान त्यांनी या प्रसंगी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे प्राचार्य डॉ.अविनाश वानखडे यांनी भूषविले तर विभाग प्रमुख प्रा. रुचिर गोडबोले व प्रभारी प्रा.स्टुडंट्स अफेयर प्रदीप दुधाट व्यासपीठावर उपस्थित होते.
खुनाच्या घटनां पेक्षाही नवयुवकांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे जळजळीत वास्तव त्यांनी विद्यार्थ्यांना अवगत करून देत सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा आणि त्या बाबतची जागरूकता निर्माण करावी असे निक्षून नमूद केले. त्यांनी या प्रसंगी कायद्यातील विविध कलमे जसे की मकोका,पोक्सो,सायबर क्राईम, अपहरण, बाल गुन्हेगारी, ड्रग्स आणि व्यसनधीनता या विषयी विद्यार्थ्यांना अवगत केले. शेवटच्या टप्प्यात त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या कायदे विषयक प्रश्नांना मुक्तपणे हसतमुख उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. सर्वात शेवटी त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द, परिश्रम निरंतरता,आत्मविश्वास व भाषा कौशल्य या सर्व घटकांवर लक्ष केंद्रित करून स्वप्नपूर्ण करण्याचा या प्रसंगी सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्रदर्शन विभाग प्रमुख प्रा. रुचीर गोडबोले यांनी केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक व प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
(गुन्हा घडण्या पूर्वीच सारासार विचाराने वागून जर कायद्याचे पालन केले तर स्वतः व कुटुंबाला समाजात समाधानी जीवन जगता येईल. कायद्याच्या पालनासाठी स्वतः जागरूक असणे व इतरांनाही जागृत करण्याचे उद्दिष्ट सगळ्यांनी बाळगल्यास समाजाची घडी नीट बसविण्यास व समाजाच्या प्रगतीस मदत होईल.)…डॉ. अविनाश वानखेडे प्राचार्य, बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद







