श्री रेणुकादेवी महाविद्यालयात पाचवा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न

✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि.14 ऑक्टोबर) :- 

     बळीराम पाटील मिशन, मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीक्षेत्र माहूर येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा समारंभ मंगळवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

     या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रफुल्लजी राठोड यांनी भूषविले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. विलास पाटील, तसेच महाविद्यालयातील विविध विभागप्रमुख उपस्थित होते. समारंभाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

     प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना म्हटले की, “शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून, समाजकारण आणि आत्मविकासाची दिशा देणारे साधन आहे.” अध्यक्षीय भाषणात प्रफुल्लजी राठोड यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आणि समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

     कार्यक्रमात कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील एकूण १३६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. गेल्या पाच वर्षांपासून महाविद्यालय स्तरावर हा पदवी वितरण समारंभ आयोजित करण्यात येत आहे. 

     समारंभाचे प्रास्ताविक संस्था समन्वयक डॉ तुळशीदास गुरनुले यांनी, सुत्रसंचालन उपप्राचार्य प्रो. राजेंद्र लोणे यांनी, तर उपस्थितांचे आभार पदवी समारंभाचे समन्वयक डॉ. मोहम्मद नसीरुद्दीन यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, पदवीधारक व विद्यार्थी, बहुसंख्येने उपस्थित होते.