🔹प्रकल्प रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
✒️ यवतमाळ (Yavatmal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
यवतमाळ(दि.14 ऑक्टोबर) :-
यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी व वंचित जनतेच्या जिवावर उठलेला “निम्न पैनगंगा प्रकल्प” तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा ठाम इशारा भारत मुक्ती मोर्चा – सामाजिक संघटनेने दिला आहे. या मागणीसाठी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
संघटनेने निवेदनात नमूद केले की, हा प्रकल्प पेसा कायद्याचे उल्लंघन करणारा असून, ग्रामसभेच्या संमतीशिवाय राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे यवतमाळमधील 54 आणि नांदेडमधील 36, अशा एकूण 95 गावे बाधित होत असून, जवळपास 50,000 एकर सुपीक शेती पाण्याखाली जाणार आहे. सुमारे 1.5 लाख लोकांचे विस्थापन, त्यात 70,000 आदिवासी बांधवांचा समावेश आहे.
ग्रामसभांनी एकमुखी विरोध दर्शवला असतानाही शासन जबरदस्तीने प्रकल्प रेटत असल्याचा आरोप संघटनेने केला. अनेक विभागांची आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे (NOC) उपलब्ध नाहीत, तर काहींचा कालावधी संपलेला आहे, असेही निवेदनात नमूद आहे.
संघटनेने 9 जुलै 2024 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच “95 गावे आणि 50 हजार एकर जमीन बुडवून विस्थापन करणे शक्य नाही” असे विधान केल्याचे स्मरण करून दिले. 2024 विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्णी येथे राजु तोडासाम आणि किनवट येथे भिमराव केराम यांच्या प्रचारसभेत हे आश्वासन दिले होते दोन्ही आमदार निवडून आले आणि भाजापा चे सरकार आले तर प्रकल्प रद्द करू.
“मग आज तेच शासन ग्रामसभांच्या विरोधात जाऊन प्रकल्प का राबवत आहे?” असा सवाल भारत मुक्ती मोर्चाने उपस्थित केला.
संघटनेच्या मते, या प्रकल्पामुळे शेती उद्ध्वस्त होईल, रोजगार नष्ट होतील, आणि आत्महत्येच्या घटना वाढतील. त्यामुळे शासनाने तात्काळ पुढील पावले उचलावी आणि प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
✊ भारत मुक्ती मोर्चाच्या प्रमुख मागण्या:
1. “निम्न पैनगंगा प्रकल्प” तात्काळ रद्द करावा.
2. पेसा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
3. ग्रामसभांच्या ठरावांना कायदेशीर मान्यता द्यावी.
4. बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसन व नुकसानभरपाईसाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी.
जनआक्रोश मोर्चाचे आवाहन
या अन्यायकारक प्रकल्पाविरोधात जनतेचा रोष तीव्र होत असून,
भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने १५ ऑक्टोबर २०२५ (बुधवार) रोजी
आझाद मैदान, बस स्टँड चौक, यवतमाळ येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत “जन आक्रोश मोर्चा” काढण्यात येणार आहे.
संघटनेने शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, युवा, बेरोजगार तरुण, व्यापारी व सर्व नागरिकांना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी मधुकर हटकरे, साहेबराव पुनवटकर, माधव उईके, रामपाल मडावी,भुवन मुनेश्र्वर यांनी केले आहे.
(“ही लढाई केवळ जमिनीची नाही, तर जगण्याच्या हक्काची आहे. शासनाने प्रकल्प रद्द केला नाही, तर भारत मुक्ती मोर्चा हा संघर्ष आणखी तीव्र करेल!)”सुनील गवई भारत मुक्ती मोर्चा, जिल्हा अध्यक्ष यवतमाळ







