महागाव तालुक्यामध्ये सर्वत्र गावठी आणि देशीचा दारूचा सुळसुळाट

🔸पिंपळगाव( ई.) येथील महिलांनी दारूबंदीसाठी महागाव पोलिसांना दिले निवेदन 

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.5 ऑक्टोबर) :- 

पिंपळगाव ( ई.) येथे प्रचंड गावठी दारूचा सुळसुळाट झाला असल्याने गावामध्ये गावठी दारू सहज उपलब्ध होत आहे. परिणामी युवक वर्ग मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी गेला आहे. त्या मुळे अनेक कुटुंबात वादविवादाचे प्रसंग उद्भवत आहेत. सण उत्सवाचे दिवस आहेत, परंतु दारूच्या आहारी गेलेल्या युवकांचे आपल्या कुटुंबात दैनंदिन वाद विवाद होत असल्याने महिला कमालीच्या वैतागून गेल्या आहेत. त्या मुळे पिंपळगाव येथील महिलांनी शुक्रवारी महागाव पोलीस स्टेशनवर धडक देत दारूबंदीसाठी निवेदन दिले. 

  महागांव शहरासह तालुक्यांत अनेक गावांमध्ये देशी आणि गावठी दारूच्या विक्रीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली. त्या मुळे दैनंदिन समस्येचे निराकरण व्हावे या साठी महिलांनी महागाव पोलीस स्टेशनला धडक देत दारूबंदीची मागणी केली. काहीच दिवसापूर्वी करंजखेड, कलगाव येथील महिलांसह गावातील सरपंच यांनी दारूबंदीचा ठराव घेत गावातील गावठी बंद करण्याची मागणी केली. कायदा व सुव्यवस्थेता अबाधित राहवी, या साठी दारू बंदी होणे गरजेचे झाले. महिलांना दारूच्या आहारी गेलेल्या युवकांकडून कुटुंबात मारहाण होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले. त्या मुळे वादविवादाचे प्रकार ही नित्याची बाब झाली आहे ‌ गाव खेड्यामध्ये व्यसनाधीन युवकांची संख्या वाढल्याने चोऱ्या चपाट्याचे प्रमाण वाढले आहे. परिसरात वाढलेल्या अवैध धंद्यामध्ये वाढ झाली आहे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत आहे. शुक्रवारी महागाव पोलीस स्टेशनच्या पीएसआय सरस्वती राठोड यांना निवेदन देण्यात आले. 

(ग्रामीण भागातील दारूबंदी व्हावी, या साठी अनेकदा महिलां द्वारे पोलीस विभागाकडून कार्यवाही होत दारूबंदी होणे अपेक्षित असतांना ती होते का? हे महत्त्वाचे आहे.)

(महागाव येथे अधिकृत असलेले शासनमान्य देशी देशी दारूचे दुकान सकाळी सहा वाजताच्या दरम्यान उघडून शेकडोच्या संख्येने देशी दारूच्या पेट्या चिल्लर विक्रेत्यांना विकल्या जातात. महागाव शहरात किमान 35 च्या वर अवैध चिल्लर विक्रीचे दुकाने थाटली आहेत.पोलीस विभागांनी आणि एक्ससाइज विभाग पुसद यांनी या बाबीकडे लक्ष घालून सर्रास मिळणाऱ्या देशी दारू विक्रीवर पायबंद घालावा असा सुज्ञ नागरिकातून प्रश्न उपस्थित होत आहे.)

(खेड्यापाड्यातील गावठी दारूमुळे अनेक युवकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे दारू विक्रेते दारू तयार करतांना दारू अधिक कडक कशी बनवता येईल? या साठी वेगवेगळे फंडे वापरत ही दारू बनवत असल्याचे बोलल्या जाते.परिणामी अशा दारूमुळे अनेकांना विविध आजारांची समस्या उद्भवत आहे. महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या प्रत्येक बीट मध्ये गावठी दारूच्या विक्रीत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते. पोलीस निरीक्षकांच्या काहीच लक्षात न येऊ देता बिट जमादार संबंधित गावठी, देशीदारू विक्रेत्यांशी हात मिळवणी करून खुलेआम मुक संमती दिल्याने हे धंदे फोफावले असल्याचे महिलांतुन चर्चा होती. सर्वत्र वाढलेला दारूचा सुळसुळ कमी करून महिलांना दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी या प्रसंगी महिलांनी केली आहे.)