🔸मुरूम वाहतुकीने फुटलेला केरोळी रुई रस्ता दुबार बनवून द्यावा
🔹आठ गावांच्या सरपंचासह नागरिकांनी माहूरच्या तहसीलदारांना दिले निवेदन
🔸शारदा कंट्रक्शन कंपनीने मोठ्या हायवा द्वारे मुरूम वाहतूक केल्याने रुई केरोळी रस्ता फुटल्याने अपघात वाढले
✒️ शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.4 ऑक्टोबर) :-
माहूर तालुक्यात अनेक ठिकाणी विकास कामे करत असलेल्या शारदा कंट्रक्शन कंपनीकडून होत असलेल्या सर्वच कामात हायगय होत असल्याने नागरिकांना भाविकांना प्रचंड त्रास होत असून पैनगंगा नदीवर बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूने मुरूमाचा भराव टाकून रस्ता बनविण्यासाठी रुई येथिल सर्वे नंबर 57 मधून गेल्या महिन्यात आठ दिवस परवानगी घेऊन मोठ्या हायवा द्वारे रात्रंदिवस वाहतूक करून रस्त्याच्या चिंधड्या उडविण्यात आल्या तर पुन्हा आठ दिवसाची परवानगी देण्यात आल्याने मोठाले खड्डे पडून नागरिकांचे अपघात होत असल्याने माहूर तालुक्यातील रुई हडसणी दिघडी कु. हिंगणी, ईवळेश्वर तांदळा गुंडवळ या गावातील सरपंचांच्या वतीने माजी नगरसेवक तथा पत्रकार इलियास बावाणी पत्रकार राज ठाकूर यांनी निवेदन देऊन सदरील रस्त्यावरून हायवा द्वारे मुरूम वाहतुकीची परवानगी देऊ नये रस्ता दुबार बनवून द्यावा अन्यथा पुन्हा परवानगी दिल्यास रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा तहसीलदार अभिजीत जगताप यांना दि 3 रोजी निवेदनाद्वारे देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
शारदा कंट्रक्शन कडून अनेक वर्षापासून धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून या कामात अनेक गैरप्रकार झाल्याने कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात शेकडो तक्रारी झालेल्या आहेत तर माहूर शहरातील पथदिवे पेव्हरब्लॉक तसेच रस्ता रुंदीकरणात मापात पाप केल्याने कंपनीला माहूर तालुक्यात कामे देऊ नये अशी मागणी होत असून धनोडा केरोळीच्या मध्ये असलेल्या पैनगंगा नदीवर पूल दुसऱ्या कंपनीने पूर्ण केला परंतु गेल्या दोन वर्षापासून दोन्ही बाजूचे अर्धा अर्धा किमीचे रस्ते बनविले नसल्याने वरिष्ठाकडून दबाव आल्यानंतर मनमानी पद्धतीने काम सुरू करण्यात आले.
जवळपास 50 हजार बरास मुरूम लागणार असल्याने तितक्या मुरमापोटी रॉयल्टी भरावयास पाहिजे असताना दोन वेळा पाचशे बरास मुरुमाची रॉयल्टी काढून जवळपास 25 हजार बरास मुरूम नेण्यात आला आणि तोही पुलाच्या कामावर न वापरता बंधाऱ्याच्या कामावर वापरल्या गेल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंनी भराव टाकण्याचे काम अद्यापही जैसे थेच असल्याने कंत्राटदाराचा शासनाची फसवणूक करून वाहनधारकासह भाविकांना त्रास देण्याचा उद्देश स्पष्ट दिसत असल्याने कंत्राटदाराविरुद्ध सरपंचांनी निवेदन दिल्याने असंतोष भडकत असल्याची चर्चा नागरिकात सुरू झालेली आहे.
पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले खासदार नागेश पाटील आष्टीकर आमदार भीमराव केराम सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतूला याचे सह माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी कंपनीकडून अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे तात्काळ पुलाचे काम करून घ्यावे व त्यांनी भरलेल्या रॉयल्टी पेक्षा जास्तीचा मुरूम नेला असल्यास त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राज्यमार्ग प्राधिकरणाला तंबी देत फुटलेला रुई ते केरोळी रस्ता दुबार बनवून घेत कंपनीला काळ्या यादी टाकावे अशी मागणी नागरिकांतून होत असून सरपंचांनी निवेदन दिल्याने या मागणीला दुजोरा मिळत आहे.







