वि. रु. महाविद्यालयात प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन

🔹विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक प्रेरणेचा प्रवास

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.15 सप्टेंबर) :- 

१३ सप्टेंबर २०२५ रोजी, महाराष्ट्राच्या सवना तालुक्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी महाविद्यालयात एक महत्त्वाचा व अभिमानास्पद कार्यक्रम घडला. प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना प्राणीशास्त्र विषयात अधिक संशोधन, शिक्षण आणि व्यावहारिक अनुभव घेण्याची प्रेरणा देणे हा आहे.

  या दिवशी झालेल्या कार्यक्रमाने महाविद्यालयीन शिक्षण व संशोधन क्षेत्रात एक नवे पर्व सुरू झाले. ज्या मुळे विद्यार्थी व प्राध्यापक वर्गात नवचैतन्याचा संचार झाला.सकाळी १० वा.महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्व विभागांचे विद्यार्थी, प्राध्यापक व अभ्यागतांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती दर्शविली होती. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. डॉ. महल्ले यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली.

डॉ. महल्ले यांनी प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाच्या स्थापनेचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मंडळाची भूमिका व भविष्यातील संधी या वर भाष्य केले. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ येथील अमोलोकचंद महाविद्यालयाचे प्रख्यात डॉ. अश्विन अतकुलवार त्यांनी आपल्या शैक्षणिक अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देत, संशोधनात पुढे जायचे आव्हान दिले. प्रसंगी इंग्रजी विभागप्रमुख प्रा. पी.पी. जैस्वाल, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. नासिर शेख यांनी आपल्या विद्यार्थ्यां प्रति शुभेच्छा व्यक्त करत उत्तम कार्यासाठी प्रोत्साहन दिले. सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला औपचारिकता व महत्त्व आले.कार्यक्रमात प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. पंकज वामनराव चौधरी यांनी डॉ. अतकुलवार यांचा शैक्षणिक व संशोधनात्मक परिचय करून दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना प्राणीशास्त्र विषयातील विविध संधी व आव्हाना बाबत माहिती दिली. डॉ.अतकुलवार यांनी सत्र २०२५-२६ साठी प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटनाची घोषणा केली.

या बैठकीत विद्यार्थ्यांच्या नेतृत्वासाठी विविध पदांची निवड झाली. अध्यक्ष म्हणून बी. एस. सी. भाग ३ ची विद्यार्थिनी पायल पायघन, उपाध्यक्ष म्हणून कु. सानिका वाघमारे, सचिव म्हणून शिवम गायकवाड, सहसचिव शेखर राठोड, कोशाध्यक्ष शिवप्रसाद राऊत,सहल प्रमुख श्रीकांत हातमोडे, ॲनिमल प्रोटेक्शन युनिट हेड कु. वैष्णवी मोरे, ग्रीन आर्मी प्रमुख भारती काकडे, इको-फ्रेंडली क्लब मध्ये प्रतीक्षा काकडे व सानिया पठाण, तसेच पब्लिसिटी हेड म्हणून सिद्धांत गावंडे व विशाल हराळे यांची निवड करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी स्वीकारून अभ्यास मंडळासाठी आपला समर्पित प्रयत्न करण्याचा संकल्प केला.

 कु. पूजा पांडव यांनी सत्र २०२४-२५ मध्ये अभ्यास मंडळाच्या माध्यमातून राबविलेल्या विविध योजना प्रकल्पांचा संक्षिप्त आढावा दिला. या प्रकल्पांतर्गत, प्राणी संरक्षण, पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक व जनजागृती मोहिमांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्णपणे या योजनांवर काम केले. प्रत्येकाने अनुभव व शिकवण यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणा पैकी एक म्हणजे, डॉ. अतकुलवार यांनी “स्कोप्स अँड फ्युचर परस्पेक्टीवस इन झुलॉजी” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. प्राणीशास्त्रातील विविध शाखांतील संधी, संशोधन क्षेत्रातील नवे ट्रेंड्स, व करिअरच्या संधींवर प्रकाश टाकला. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांत संशोधनाची आवड व जागरूकता निर्माण झाली.

प्राचार्य डॉ. हेमंत महल्ले यांनी व्याख्यानाच्या स्वरूपातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत पुढील काळातही नवीन संशोधन व शिक्षण घेण्याची प्रेरणा दिली. प्रा. जैस्वाल व प्रा. शेख यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत, त्यांच्या उद्याच्या शिक्षणात उत्तम प्रगती होईल, अशा शुभेच्छा दिल्या.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल पायघन यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थापन मार्गदर्शना साठी प्राचार्य,प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, प्रा.अनिल खाडे, प्राणीशास्त्र विभागाच्या सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले. उद्घाटन सोहळ्यानंतर प्राणीशास्त्र अभ्यास मंडळाने विविध कार्यशाळा,संशोधन प्रकल्प, वृत्तपत्रीय लेखन स्पर्धा,पर्यावरण जागरूकता मोहिम व वृत्तपत्रे प्रकाशित करण्याची योजना आखली आहे.विद्यार्थ्यांना संशोधनात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या कार्यक्रमामुळे,महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रात एक नवीन पर्व सुरू होणार आहे.

(श्री विठ्ठल रुक्मिणी कॉलेज सवना येथील या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक, संशोधनात्मक प्रेरणा जागृत केली. भविष्यात या अभ्यास मंडळाच्या माध्यमातून अनेक संशोधन प्रकल्प, जागरूकता मोहीम व सामाजिक उपक्रम राबविले जातील. या सर्व प्रयत्नांमुळे, प्राणीशास्त्र क्षेत्रात उत्तम संशोधन व शिक्षण घेण्याची दिशा निश्चितच मजबूत होईल. विद्यार्थ्यांच्या सदिच्छा, शिक्षकांचे मार्गदर्शन व संस्थेची सहकार्य या मुळे, ही पुढील वाटचाल अधिक फलदायी ठरेल.)…प्राचार्य डॉ. हेमंत महल्ले,श्री. विठ्ठल रुक्मिणी कॉलेज, सवना