✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.15 सप्टेंबर) :- महागाव नगरपंचायत यांच्याकडून दिव्यांग कल्याण निधी गेल्या तीन वर्षापासून रखडलेला होता .त्यास प्राधान्य क्रमाने घेऊन दिव्यांग कल्याण निधी वाटप करण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आलेले आहे. या बाबत महागाव न.प.च्या नगराध्यक्ष सुनंदा कोपरकर यांनी 18 ऑगस्ट रोजी विषय क्र. आठ नुसार विषय पत्रिकेवर अजेंड्यावर विषय घेऊन हा विषय तात्काळ मार्गी लावण्याचे ठरविले होते, त्या अनुषंगाने न.प. च्या सर्वसाधारण सभेत ठराव क्र. आठ नुसार त्यास मान्यता देण्यात आली. लाभार्थ्यांच्या दिव्यांग कल्याण निधी खात्यात जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची सुत्रांची माहिती आहे.
सदर निधी हा नगरपंचायत निधी अंतर्गत पाच टक्के लाभांश म्हणून देण्यात येत असतो. सदर निधीबाबत बजेटमध्ये तरतूद सुद्धा करण्यात आल्याची माहिती महागाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सुनंदा दिलीपराव कोपरकर यांनी दिलेली आहे.दिव्यांग कल्याण निधी हा नगरपंचायतच्या स्वतःच्या उत्पन्नातून खर्च केल्या जात असतो.
दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत महागाव शहरातील पहिल्या टप्प्यात 75 लाभार्थ्यांची यादी महागाव येथील भारतीय स्टेट बँक, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक, तसेच युनियन बँकेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वळता करण्यात येत असल्याची माहिती महागाव नगरपंचायतचे लेखापाल नितीन हरीमकर यांनी दिलेली आहे. प्रत्येक लाभार्थींना 3,840 रुपये निधी देऊ केलाआहे.सदर निधी टाकण्याची कार्यवाही सर्वसाधारण सभेच्या झालेल्या ठरावाच्या अनुषंगाने महागाव न.प.चे प्रभारी मुख्याधिकारी महेश कुमार जामनोर यांच्या मार्गदर्शनात लेखापाल नितीन हरीमकर,लिपिक विष्णू कांबळे यांनी केली आहे.महागाव न.प. च्या दिव्यांग कल्याण निधी वाटपाच्या अनुषंगाने महागाव न.प.च्या सर्वसाधारण सभेत नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सुनंदा कोपरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीला प्रामुख्याने महागाव न.प.चे उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती प्रमोद भरवाडे,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वीकृत नगरसेवक संभाजीराव नरवाडे,सुजित ठाकूर,करूना शिरबिरे, विशाल पांडे,रंजना आडे, सुनिता डाखोरे,रामराव नरवाडे,जयश्री इंगोले, गजानन साबळे,रूपाली कोल्हेकर, सुरेखा कोपरकर, महागाव न.प.चे काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा नगरसेवक शैलेश कोपरकर, नगरसेवक महेश पाटील,आशा बावणे, जयश्री नरवाडे, परवेज सुरय्या, सुरेश नरवाडे, यांच्यासह अधिकारी,कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
(दिव्यांग कल्याण निधीमुळे शहरातील दिव्यांग नागरिकांना देण्यात आलेल्या अनुदानामुळे दिव्यांगातून आनंद व्यक्त होत आहे.महागाव शहरातील दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत अद्याप कोणी लाभार्थी प्रथम यादीतून सुटला असेल तर त्यांनी महागाव नगरपंचायतच्या कार्यालयात रीतसर नमुन्या मध्ये अर्ज सादर करावा, त्यांना दिव्यांग कल्याण निधीचा लाभ व त्यांचा हक्काचा लाभांश देण्यात येईल. दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत वाटप करणाऱ्या निधीत एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची प्राधान्याने काळजी घेतल्या जाईल.)…सुनंदा कोपरकर, नगराध्यक्षा, महागाव नगरपंचायत







