✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.5 सप्टेंबर) :-
उमरखेड /महागाव विधानसभा मतदारसंघात ऑगस्ट महिन्यात झालेल्या नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचे आणि शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेला जवळपास महिना होत आहे. अद्याप नुकसानग्रस्तांना शासनामार्फत मदत मिळाली नसल्याने 4 सप्टेंबर रोजी विभागाचे आमदार किसनराव वानखेडे यांनी मुख्यमंत्र्यी महोदया कडे मागणी निवेदन सादर केले आहे.
उमरखेड व महागाव या दोन्ही तालुक्यांत सोळा, सतरा, अठरा ऑगस्ट रोजी आणि त्यानंतर आठवडा भराने झालेल्या अतीवृष्टीमुळे पैनगंगा व पूस नदीच्या काठावरील,नाल्या जवळील शेतामंध्ये महापूराचे पाणी शिरल्याने अनेकांची पिके खरडून गेली.तीन ते चार दिवस पिके पाण्याखाली होती. महागाव तालुक्यांत फुल सांगवी या गावी 50 च्या वर नागरिकांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. उमरखेड तालुक्यांमध्ये सुद्धा अनेक नागरिकांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हातातोंडाशी आलेली पिके,घरातील अन्नधान्य वाहून गेल्याने अनेकांची संसारे संकटात आली आहेत. या वर्षी नैसर्गिक आपत्ती मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह विजांच्या तडाख्यात अनेक जणांची जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. या मध्ये वेणी आधरपुस प्रकल्पाच्या परिसरामध्ये धारकान्हा शिवारात विज कोसळून अनेक जनावरे मृत्युमुखी पडले. नुकसानी संदर्भातील पंचनामे सोपस्कार सुद्धा आटोपले. एका महिन्याच्या वर कालावधी उलटला आहे. अद्याप अनेक जन आर्थिक मदतीपासून वंचित आहेत.
याच अनुषंगाने काल उमरखेड महागाव विधानसभा मतदार संघाचे आमदार किसनराव वानखेडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना तात्काळ मदत देण्यासंदर्भात विनंती निवेदन सादर करीत तातडीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यात यावा अशी मागणी केली आहे.







