✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि .4 सप्टेंबर) :- येथून जवळच असलेल्या थोराणा येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या वतीने देशसेवा करणाऱ्या शिवम पांडुरंग कुंभारे या तरुणाचा सत्कार नुकताच करण्यात आला. त्याचा हा सन्मान कुटुंबियांनी स्विकारला.
थोराणा हे एक छोटंसं गाव. या गावाची लोकसंख्या अवघी तीनशेच्या घरात. येथील शिवम कुंभारे नावाच्या युवकांने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या भरोशावर भारतीय सैन्यात नोकरी मिळवली. सध्या शिवम मेरठ येथे कार्यरत आहे. तो थोराणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा माजी विद्यार्थी होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवीदास बोदाडकर हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष योगिता भोयर, प्रकाश बावणे, पार्वती बोदाडकर, सुषमा भट, मेघा रिंगोले, आशावर्कर पूजा मिलमिले, उज्वला बोदाडकर, जया भट, वैशाली काळे, कैलास बोदाडकर, शापोआ कर्मचारी उषा रिंगोले, आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कारमूर्ती म्हणून सैनिक शिवम कुंभारे यांचे वडील पांडुरंगजी कुंभारे, आई शोभा कुंभारे, भाऊ कार्तिक कुंभारे यांची विशेष उपस्थिती होती.
त्यानंतर सैनिक शिवम पांडुरंग कुंभारे यांचा सन्मान वडील पांडुरंग कुंभारे आणि कुटुंबियांनी स्विकारला. शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन, प्रास्तविक मुख्याध्यापक अरूण उमरे यांनी केले. आभार सहाय्यक शिक्षक डी.एन. वाभीटकर यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, अंगणवाडी कर्मचारी, शापोआ कर्मचारी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







