🔸तीस वर्षांपासून अखंडित गणेशोत्सव करतात साजरा.

🔹वेकोलीच्या बंद व खुल्या कोळसा खाणीचा व ऑपरेशन सिन्दुर देखावा ठरला लक्षवेधी
✒️ सौ. सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा(दि.1 सप्टेंबर) :-
रामपुर येथील निवासी रामचंद्र घटे यांच्या घरी घरगुती गणेश गेल्या तीस वर्षांपासून बसतो. पाच दिवस अत्यंत आनंदी भक्तीमय वातावरणात सामाजिक जनजागृती करणारे वेगवेगळे विषय सुद्धा लक्षवेधी ठरतात. घटे यांच्या परिवारात वडील, मुलगा, जावई आणि परिवारातील बहुतांश नातेवाहिक मंडळी ही वेकोली कोळसा खाणीशी संबंधित कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे घटे कुटुंबीयांनी आपल्या कार्यक्षेत्रावर आधारित वेकोलीच्या बंद व खुल्या कोळसा खाणीचा सुंदर असा देखावा तयार करून परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले. सोबतच ऑपरेशन सिन्दुर देखावा सुद्धा तयार करण्यात आला.
यापूर्वी प्राचीन किल्ले संवर्धन, जल व्यवस्थापन , पर्यावरण संवर्धन, भरडधान्य वापर महत्व, शेतकरी आत्महत्या, कोरोनावर आधारित संदेश जनजागृती, स्वच्छता मोहीम असे विविध सामाजिक संदेश देणारे देखावे साकारले. याकार्यात पत्नी सुनंदा, मुलगा आकाश, सून मानसी, मुलगी वैष्णवी, जावई योगेश अगळे यांचे सहकार्य लाभते. संपूर्ण कुटुंब एकत्रित येऊन गणेशोत्सवा सोबतच सामाजिक संदेश, जनजागृती करणारे देखावे तयार करतात. यावर्षी वेकोलीच्या बंद व खुल्या कोळसा खाणीत कसे काम चालते, खान कशी असते, सुरक्षा साहित्य कसे असतात, बल्ली सपोर्ट, चाक सपोर्ट, रोप सपोर्ट, फॉल एरिया, ओबी बेंच, कोल बेंच, कोल स्टॉक, चेक पोस्ट, लायटिंग टॉवर, सुरक्षा निर्देश असे विविध बाबींना देखाव्यात साकारले आहे.







