✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव (दि.16 ऑगस्ट) :- तालुक्यातील शिरपुली, राहुर, फुलसांगवी, काळी, टेंभी परिसरामध्ये शुक्रवारी, शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी नाल्यांना पूर आल्याने शिरपूल्ली, कुपटी येथील नाल्या लगतच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. तर कासोळा महसूल मंडळात निसर्गाच्या प्रकोपामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. नदी, नाल्या काठच्या शेतमालाचे कधीही भरून न निघणारे मोठे नुकसान झाले आहे. शेतीला तळ्याचे स्वरूप आले असून तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात सापडला आहे.
काल 15 ऑगस्ट रोजी सकाळच्या दरम्यान झालेल्या मुसळधार पावसात शिरपूली आणि राहुर दरम्यानच्या मेळाच्या नाल्याच्या पुराने ग्यानबा यादव पिंपळे या शेतकऱ्यांच्या कपासी पिकांचे मोठे नुकसान झाले. आत्माराम चौधरी यांच्या सोयाबीन पिकाचे ही प्रचंड नुकसान झाले. ज्ञानेश्वर चौधरी यांच्या हळद पिकांचे सुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.
नाल्यालगतच्या शेतशिवारात शेतकरी पवन चौधरी यांच्या सोयाबीन पिकांमध्ये पुराचे पाणी गेल्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे. सतत दोन तास ढगफुटी सदृश्य पावसाने पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. छोट्या मोठ्या नाल्याला आलेल्या पुराने शेत पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांनी रंगविलेले स्वप्न पार उध्वस्त झाले.
कधी निसर्गाचा प्रकोप तर कधी शेतपिकांचे पडलेले चढउतार भाव, खाते औषधींची वाढलेली दर या मुळे शेतकरी पार मेटाकुटीस आल्याचे वास्तव आहे. पैनगंगानदीला आलेल्या महापुरामुळे परिसरातील नाल्याला मोठ्या प्रमाणात डाब आला व शेतात पुराचे पाणी शिरून सोयाबीन, कपासी, हळद व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पिके खरडून गेल्याने फुलसांगवी, राहूर, शिरपूली या गावातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
या प्रचंड पावसामुळे राहुर, शिरफुली या गावांचा संपर्क तुटला आहे. तहसील प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून केली जात आहे.
(शेतकरी, शेतमजुरांनी सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीत घराच्या बाहेर पुराच्या पाण्यामध्ये जाऊ नये. आपण सुरक्षित ठिकाणी राहावे, प्रशासनाने या गावाच्या संपर्कात राहून नागरिकांना सहकार्य करावे. पावसाचा जोर असाच राहिला तर काही गावांमध्ये नदी, नाल्याच्या काठावरील गावात पाणी शिरायला वेळ लागणार नाही. त्यासाठी नदीनाल्या काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे).निखिल विठ्ठलराव मोरतकर, शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ता
शिरपुली आणि कुपटी ( माहूर) पैनगंगा नदीचे विहंगम दृश्य दिसत आहे. तर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अशाप्रकारे प्रचंड नुकसान झाले आहे.







