✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)
महागाव (दि.9 ऑगस्ट) :-
भारतीय जनता पक्षाच्या पुसद जिल्हा कार्यकारिणीची 5 ऑगस्ट रोजी अधिकृत घोषणा करण्यात आली. या मध्ये महागाव तालुक्यातील पाच प्रमुख कार्यकर्त्यांना मानाची पदे बहाल केली आहेत. या निवडीमुळे महागाव तालुक्यातील भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याने पक्ष संघटन कार्यासाठी बळकटी मिळाली आहे.
जिल्हाध्यक्ष डॉ. आरतीताई फुपाटे,आमदार किसनराव वानखेडे, जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा, माजी आमदार नामदेवरावजी ससाने यांच्या नेतृत्वाखाली गठीत केलेल्या कार्यकारणीत युवा सरपंच संघटना अध्यक्ष अमोल चिकने यांची जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली आहे. तर जयश्री राठोड महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी, अजय पुरोहित याची जिल्हा उपाध्यक्ष पदी, समाधान ठाकरे जिल्हा सचिव पदी, महेश नाईक जिल्हा उपाध्यक्षपदी, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास भुसारे आदिवासी मोर्चा अध्यक्षपदी निवड झाली आहे. एड. कैलास वानखेडे कायदा सेल अध्यक्षपदी तर मुकुंद पांडे बुद्धिजीवी सेल अध्यक्षपदी अशी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारणीची रचना करतांना विविध समाज घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित केले आहे. महागाव मधील कार्यकर्त्यांना दिलेले महत्त्व पाहता, आगामी काळात तालुक्यांत पक्ष संघटन सहभाग बळकट होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. या निवडीमुळे महागाव तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्मिती झाली आहे. या निवडी प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी नेतृत्वाचे आभार मानले.







