महागाव तहसील कार्यालयात वृद्धापकाळ योजनेत सावळा गोंधळ

🔹एका वर्षापासून वर्धापकाळ योजनेचे प्रकरणे प्रलंबित असल्याची लाभार्थ्यातून ओरड

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)

महागाव (दि.7 ऑगस्ट) :- तालुक्यातील श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत अर्ज केलेल्या अनेक पात्र वृद्ध, अपंग व विधवा लाभार्थ्यांची प्रकरणे मागील वर्षभरा पासून प्रलंबित आहेत. अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत शेकडो लाभार्थ्यां असल्याने पेन्शनधारकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अर्ज संबंधित सेतूसुविधा केंद्रामार्फत वेळेवर दाखल करण्यात आले आहेत. तहसीलचे तत्कालीन नायब तहसीलदारांनी स्वाक्षरी करून प्रकरणे संबंधित विभागाकडे वर्ग केले आहेत, तब्बल एक वर्षाचा कालावधी होऊन ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळत नसल्याने नाहक त्रास होत असल्याचे तहसील परिसरात लाभार्थ्यातून बोलल्या जाते. 

  वृद्धापकाळ पेन्शन योजनेचे अनेक गरजू लाभार्थ्यांनी एका वर्षापूर्वी महागाव तहसील कार्यालयात पेन्शन विभागात रीतसर कागदपत्रे दाखल केली आहे. परंतु या विभागातील लिपिकांनी काही अर्ज नामंजूर केले. आणि काही प्रकरणे प्रलंबित ठेवली आहेत. अर्जदारांनी अनेकदा प्रशासनाकडे विचारणा केली असता विभागातून उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत, असा वृद्ध नागरिकांतून आरोप होत आहे.

या परिस्थितीमुळे गरजू लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळत नाही. वृद्ध निराधार, महिला, दिव्यांगाना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काही लाभार्थ्यांनी असा आरोप केला आहे की, संबंधित विभागात चिरीमिरी दिल्यास अपात्र लोकांनाही पात्र ठरवले जाते.आणि त्यांचे तातडीने प्रकरणे मंजूर होत आहे. 

या प्रकरणावर आवाज बुलंद करीत लाभार्थ्यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे 4 ऑगस्ट रोजी थेट निवेदन दिले. बोगस प्रकरणांची चौकशी करून पात्र लाभार्थ्यांना त्वरित न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.  

(प्रशासनाने आज पर्यंत एक वर्ष पूर्ण होऊन अनेक वृद्धांना श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेपासून वंचित ठेवले आहे. कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गंभीर दखल घेत, गरजू लाभार्थ्यांना वृद्धापकाळ पेन्शन योजनेचा लाभ घ्यावा, अशी आमची मागणी आहे.)

प्रा. शरदचंद्र डोंगरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, महागाव

(श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेच्या अनुषंगाने जानेवारी 2024, फेब्रुवारी 2025 आणि मे 2025 अखेर श्रावणबाळ वृद्धापकाळ पेन्शन योजनेच्या तीन बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत 637 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांचे महाडीबीटी प्रणाली द्वारे संगणकीकरण करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ योजनेचे पेन्शन त्यांचे खात्यावर जमा करण्यात आले. उर्वरित काही शिल्लक राहिलेले लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी केली असता जी. बी. पराते नायबतहसीलदार यांच्या बोगस स्वाक्षऱ्या असलेल्या श्रावणबाळ योजनांच्या संचिका सेतूसुविधा केंद्रात दाखल करण्यात आल्या. ईजनी, काळी (टेंभी), फुलसांगवी येथील तलाठी यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून श्रावणबाळ योजनेच्या संचिका सेतू केंद्रात दाखल करण्यात आल्या. कलगाव, डोंगरगाव व इतर गावातील लाभार्थ्यांचे बोगस टि.सी. जोडून श्रावणबाळ योजनेच्या संचिका सेतू सुविधा केंद्रात दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच इतर अर्जाची छाननी केली असता चुकीचे कोटवार नक्कल बनावट, बनावट आधारकार्ड, शेती असलेल्या अर्जदारांनी देखील या योजनेत लाभ मिळविण्यासाठी कार्यालयात अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले. श्रावणबाळ योजनेच्या अर्जाच्या पडताळणीसाठी या कार्यालयामार्फत संबंधित लाभार्थ्यांना सुनावणी साठी हजर राहण्या बाबत नोटीसी द्वारे कळविले आहे. संबंधित तलाठ्यांच्या स्वाक्षऱ्या पडताळणीसाठी तलाठी यांना पत्र देण्यात आले आहे. कलगाव, डोंगरगाव व इतर गावातील लाभार्थी यांचे बोगस टी.सी. करिता संबंधित शाळेला पत्र देण्यात आले आहे. वरील अर्जाची पडताळणी करण्यात आल्यानंतर दोषी अर्जदारा विरुद्ध पोलीस कार्यवाही करण्यात येईल.)

अभय मस्के, तहसीलदार महागाव