🔸मागील ड्रायडेला पाच देशी विक्रेत्यावर पोलीस कार्यवाही झाली. परंतु पुन्हा नव्याने अनेक ठिकाणी विक्री चालू आहे, ही दारू नेमकी कोण्या देशीदारूच्या दुकानातून येते याचा पोलिसांनी शोधघेत पायबंद घालण्याची मागणी जोर धरत आहे
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)
महागांव(दि .7 ऑगस्ट) :-
तालुक्यातील अनेक ठिकाणी मटका, जुगार, दारू, या अवैध धंद्याला चांगलाच ऊत आला आहे. अवैधधंदे चालकांनी आता डोके वर काढले आहेत. महागाव, मुडाना, पोखरी, हिवरा,कलगाव, फुलसावंगी व आजुबाजुच्या बाहेरील गावातील व तालुक्यातील काही अवैधधंदे चालक मटका, जुगार, खुलेआम चालवत आहेत. पोलीस प्रशासन मात्र मूग गिळून गप्प का? असा सामान्यांना प्रश्न उद्भवत आहे.
या धंदेवाल्याकडे हेतूपुरस्कर महागाव पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलल्या जाते. या अवैध मटका, जुगार,दारुमुळे येथील तरुणपिढी, गोरगरीब रोजमजुर वर्ग मटका, जुगार दारूच्या आहारी जाऊन दिवसभर रोज मजुरी करून कमवलेली कमाई मटका, जुगार दारू मध्ये गमावत असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होऊन उघड्यावर आले. अनेक कुटुंबातुन झगडे, तंटे निर्माण होतांना दिसत आहेत. महागाव शहरात जवळपास पन्नास देशीदारू विक्रेते निर्माण झाले आहेत.
महागाव कार्यक्षेत्रात व्यसनाधीन युवकांची संख्या कमी होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. येथे खुलेआम सुरू असलेल्या मटका, जुगार दारूविक्री करणाऱ्याला पोखरी गावचा विरोध होत आहे, मात्र पोलिस प्रशासनाच्या वतीने धाड टाकून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नसल्याने अवैध धंदे चालकांचे पोलिस प्रशासनासोबत मधुर संबंध प्रस्थापित झाल्याने त्यांचे मनोबल वाढले असल्याची चर्चा पोखरी परिसरात होत आहे. महागांव पोलीस स्टेशनचे विद्यमान ठानेदार यांनी महागाव तालुक्यातील अनेक ठिकाणी चालू असलेले तसेच पोखरी येथे खुलेआम सुरू असलेल्या मटका, जुगार, दारू चालकावर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.







