🔸पदाचा दुरुपयोग करीत सरपंच्या यांनी स्वतःच घरकुल योजना घेणे अंगलट आले
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)
महागाव(दि.5 ऑगस्ट) :-
राहुर ता. महागाव येथिल दामोदर चाफा जाधव आणि विजय दगडू नारेवाड यांनी ग्रामपंचायत सरपंच्या विरोधात प्रशासनाकडे तक्रार केली. तक्रारीत म्हटले आहे, सरपंच्यानी पदभार स्वीकारल्या पासून गावातील लोकहितांची कामे हेतूपुरस्सर टाळले. स्वतःचे पकेघर असतांना पदाचा दुरुपयोग करीत चुकीच्या पद्धतीने शासनाची दिशाभूल करून घरकुल योजना घेतली. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 38 अन्वये जबाबदारी पार पाडली नसल्याने कलम 39 नुसार त्यांच्यावर सोमवारी अपात्रतेची कार्यवाही झाली आहे.
राहुर येथील सरपंच्या राजनंदिनी शिवाजी काचेवाड यांची दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत सरपंचपदी निवड झाली होती. गावातील दामोदर चाफा जाधव आणि विजय दगडू नारेवाड यांनी 10, 17 मार्च 2025 रोजी गटविकास अधिकारी महागाव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्हटले आहे, सरपंच्यानी पदभार स्वीकारल्यानंतर लोकहिताचे कामे करण्यास बगल देत, गावातील विकास कामांच्या देण्यात येणाऱ्या मजुरीच्या धनादेशावर हेतू पुरस्कार स्वाक्षरी करण्याचे टाळले आहे, त्या मुळे गावातील विकासाला बाधा पोहोचली आहे. पदाधिकाऱ्यांना योजनेचा स्वतः लाभ घेता येत नसतांना पदाचा दुरुपयोग करीत शासनाचे प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मंजूर करून घेतले.
दि.19 फेब्रुवारी रोजी पंधरा हजार रु. ऑर्डर सीट एमएच 2510 पीएमएवायजी 3435444 नुसार ऑर्डर सीट तयार करून चुकीच्या पद्धतीने हप्ता उचल केला होता. राहुर येथील लाभार्थ्यांचे घरकुलांचे मोकापाहणी करतांना ग्रामपंचायतचे सर्व कर्मचाऱ्यांच्या समक्ष इतरप्रवर्ग 364,अल्पसंख्यांक लाभार्थ्यांचे 49 असे एकूण 413 घरकुलांची पाहणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसांचा कार्यक्रम असल्यामुळे तात्काळ घर पाहणी करून कागदपत्रे सादर करावयाची असल्यामुळे सरपंच्या यांचे पती शिवाजी विलास काचेवाड यांनी त्यांचे घर दुरूनच दाखविले. टिनपत्रे व विटामातीचे असल्याचे संबंधिताच्या संबंधिताच्या निदर्शनास आले.
इतर सर्व लाभार्थ्यांचे ‘गाव नमुना आठ’ नुसार पक्के घरे व इतर अविवाहित लोकांची यादी पंचायत समितीला सादर करण्यात आली. ‘गाव नमुनाआठ’ नुसार ज्यांची कच्चे घरी आहेत, त्यांचे आधारकार्ड, जॉबकार्ड, बँकपासबुक यांच्या छायांकित प्रति पंचायत समितीला सादर करण्यात आल्या. त्या नंतर सचिव ग्रामपंचायत राहुर घरकुल विभागातील आरएचडी लखन चव्हाण यांना प्रत्यक्षात जिओ टॅग करून हप्ते सोडण्या संदर्भात कळविण्यात आले होते. परंतु त्यांनी तसे न करता 2018 च्या जिओ टॅग नुसार हप्ते सोडून घेतल्या बद्दल पंचायत समिती स्तरावर तशा प्रकारची तक्रार करण्यात आली.
प्रत्यक्ष त्या गावांमध्ये विस्ताराधिकारी पंचायत व आरएचइ यांच्यासोबत नव्याने रुजू झालेले सचिव प्रथमच सरपंच्या यांच्या घरी गेले असतांना, त्यांच्या घराच्या साईडने टिनपत्रे व घर हे विटा व सिमेंट छतावर जुन्या टिनांचे घर निदर्शनास आले. सरपंच्या यांनी शासनाची दिशाभूल करीत असल्याचे कबुली देत घेण्यात आलेला पंधरा हजार रुपयांचा हप्ता परत देण्याचे बयानात लिहून दिल्याचे सचिवांच्या चौकशी अहवालात नमूद आहे. सरपंच्या राजनंदनी शिवाजी काचेवाड यांचे विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 14 नुसार सदस्यत्व व सरपंच पद रद्द करणे बाबत विवाद अर्ज सादर झाला.
सचिव ग्रामपंचायत राहुर यांच्या अहवालाचे अवलोकन करून दिलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 नुसार दाखल केलेला विवाद अर्ज मंजूर करण्यात आला. यामुळे सरपंच्या राजनंदिनी शिवाजी काचेवाड ह्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 ग मधील तरतुदीनुसार प्राप्त होत असल्याच्या अधिकारामुळे त्यांना आदेशाच्या दिनांक पासून पुढील कालावधी करिता अपात्र घोषित करण्यात येत असल्या बाबत अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी 4 ऑगस्ट रोजी आदेश पारित केला आहे.







