क्रांतीची रोप रुजविण्याचे काम बौध्द विहारातुन व्हावे…माजी मंत्री,आमदार विजय वडेट्टीवार

🔸रामपुरी येथे बुध्दविहार लोकार्पण कार्यक्रम

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.16 एप्रिल) :- मनुवादी विचारसरणीच्या लोकांकडून लोकशाहीवर घाला घालण्याच काम सुरू झाले आहे. मात्र भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल संविधान हे बहुजनांसाठी कवच आहे. आपल्या सर्वांना माणुस म्हणून जगण्याचा हक्क, अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिला आहे. मनुवादी विचारसरणीला सडेतोड उत्तर देण्यासाठी क्रांतीची रोप रुजविण्याचे काम बौध्द विहारातुन व्हावे असे प्रतिपादन माजी मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, काॅंग्रेस विधीमंडळ गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

ते ब्रम्हपूरी तालुक्यातील रामपुरी येथे आयोजित आनंद बुध्दविहार लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

याप्रसंगी मंचावर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.राजेश कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी पंचायत समिती सदस्य थानेश्वर कायरकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके, शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे,पं.स.तांत्रिक अधिकारी रंजित कसारे, चिचखेडा सरपंच संजना घुटके, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, अनुसूचित जाती सेलचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, पोलिस पाटील इंदीरा तुपट यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, आज आपण आपल्या आयुष्यात सोन्याचे दिवस फक्त बाबासाहेबांच्या पुण्याईमुळेच बघत आहोत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल नसतं तर मनुवादी लोकांनी आपल्याला जवळ पण बसु दिलं नसतं.

त्यामुळे पुस्तके वाचा. बुध्द विहारात वाचनालय तयार करून त्या वाचनालयातुन अधिकारी घडले पाहिजे. मी पुरोगामी विचारांचा माणुस असुन बाबासाहेबांचा अनुयायी आहे. त्यामुळे समाजातील शेवटच्या घटक असलेल्या माणसाचा सर्वतोपरी विकास व्हावा यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहतो असेही ते म्हणाले. सोबतच बुध्द विहार हे संस्कार केंद्र व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन करीत विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेपाल मोटघरे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

विविध बौद्ध विहारांना दिल्या भेटी :- आमदार विजय वडेट्टीवार यांनी तालुक्यातील जुगनाळा, मुडझा व शहरातील शिवाजी महाराज चौक, गुजरी वार्ड, धम्मभुमी याठिकाणी जाऊन बाबासाहेबांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.