गिट्टीच्या खाणीत राखेच्या ढिगाऱ्याखाली बुडून बापलेकाचा मृत्यू

93

✒️शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.22 डिसेंबर) :- बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वरोरा येथून पाच किलोमीटर अंतरावर नागपूर- चंद्रपूर मार्गांवरील असलेल्या नंदोरी बू. येथे गिट्टी खाणीत मासेमारीसाठी गेलेल्या बापलेकाचा राखेच्या ढिगाऱ्याखाली बुडून मृत्यू झाला. रामचंद्र जंगेल (६०) व योगेश जंगेल (२७) अशी मृतांची नावे आहेत.

नंदोरी येथील काळ्या गिट्टीच्या खाणीच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून तिथे माशांची उत्पत्ती झालेली आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक पंकज जैन यांच्या मालकीच्या गिट्टी खाणीत स्थानिक मजूर रामचंद्र जंगेल व योगेश जंगेल हे दोघे बापलेक मासे पकडण्यासाठी गेले होते.

पाण्याजवळ जात असतानाच राखेचे ढिगारे खचल्याने ते पाण्यात बुडाले. घटनेची माहिती सोबतच्या दोन मुलांनी गावात जाऊन सांगितली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत बापलेकाचा मृत्यू झाला होता.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी या घटनेचा निषेध केला असून खाणींमध्ये सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला साकडे घातले आहे. घटनेबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.