पत्रकार हाच खरा समाजाचा चौकीदार…आमदार प्रतिभा धानोरकर यांचे प्रतिपादन

🔸मूल येथे व्हॉइस ऑफ मीडियाची कार्यशाळा

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.2 ऑक्टोबर) :- “महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथला पत्रकार सत्य आणि न्यायाचे रक्षण करण्याचे काम करीत आहे. पत्रकारांनी संघटित होऊन समाजातील समस्यांवर आवाज उठवावा. पत्रकार हे समाजाचा खरा चौकीदार आहे, असे प्रतिपादन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. 

आज मूल येथे व्हाईस ऑफ मीडिया तर्फे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना समर्पित चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. 

 कार्यशाळेत व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, शेतकरी नेते रवींद्र तुपकर, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रेय, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले, ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर, जेष्ठ पत्रकार आनंद आंबेकर, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांची उपस्थिती होती.

धानोरकर म्हणाल्या, “संघटना असल्याशिवाय मागण्या पूर्ण होत नाहीत. व्हॉइस ऑफ मीडिया ही एक मजबूत संघटना आहे. ही संघटना गावागावात पोहोचली आहे. पत्रकारांनी या संघटनेचा लाभ घ्यावा.” पत्रकार हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. ते समाजातील विविध घटकांना एकत्र आणून नव्या विचारांचा प्रसार करतात. तसेच, ते समाजातील गैरव्यवहारांना उघडकीस आणून न्याय मिळवून देतात.

कार्यशाळेत पत्रकारितेच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. पत्रकारांना त्यांच्या हक्कांबाबत माहिती देण्यात आली. तसेच, त्यांना पत्रकारितेतील आव्हानांना तोंड देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी सहभाग घेतला.