वरोरा येथून झाले आयुष्यमान भव मोहिमेचे जिल्हास्तरीय शुभारंभ

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.4 सप्टेंबर) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान भव या आरोग्य मोहिमेचे शनिवारी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन वारोऱ्याचे उपविभागीय अधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापुरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

हा कार्यक्रम डॉ हेमचंद कींनाके निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यसंपर्क) सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुभाष दांदडे आमदार प्रतिनिधी, डॉ बंडू रामटेके, डॉ प्रतिक बोरकर तालुका आरोग्य अधिकारी वरोरा आणि डॉ सुमित भगत उपविभागीय समन्वयक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना उपस्थित होते. 

आयुष्यमान भव ही मोहीम 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर संपूर्ण भारतात राबविल्या जात आहे.

या मोहिमेअंतर्गत नागरिकांचे आयुष्यमान भारत गोल्डन इ कार्ड काढायचे आहे. यामुळे या लोकांना आरोग्य संस्थेत दुर्धर आजार आणि शस्त्रक्रिया करिता 5 लाखाचे विमा संरक्षण मिळणार आहे. 

तसेच सर्व जनतेने आभा कार्ड काढून घेण्याचे जनजागरण विविध माध्यमातून करायचे आहे. आभा कार्ड काढल्यास प्रत्येक व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती आभा नंबर टाकताच मिळणार आहे. आभा कार्ड मुळे रुग्णांना मोठमोठ्या फाईल किंवा तपासणी रिपोर्ट सोबत बाळगण्याची गरज नाही.

त्याचप्रमाणे या मोहिमेअंतर्गत लोकांच्या उच्चरक्तदाब, मधुमेह, कर्करोग, क्षयरोग, कुष्ठरोग, हत्तीरोग आणि गरोदर मातेंच्या तपासण्या होणार आहेत. याचबरोबर 0 ते 18 वर्षातील अंगणवाडी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची सुद्धा तपासणी होणार आहे. उपस्थित मान्यवरांनी सर्व जनतेस या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे लाभ घेण्याचे आव्हान केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा रुग्णालय वरोराचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रफुल्ल खुजे यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन सोनाली रासपायले यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहायक अधिसेविका वंदना बर्डे यांनी केले.

कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालय येथील अधिकारी व कर्मचारी तसेच रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक हजर होते.