धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध… ना. श्री. सुधीर मुनगंटीवार Govt committed to bring Dhangar society into mainstream… Na.shri. Sudhir Mungantiwar

55

▫️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २२८वा पुण्यतिथीनिमित्त धनगर समाज मेळावा व गुणवंतांचा सत्कार सोहळा(Punyashlok Ahilya Devi Holkar on the 228th death anniversary of Dhangar Samaj Mela and felicitation ceremony of meritorious persons)

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.14 ऑगस्ट) :- धनगर समाजाच्या एकात्मिक विकासासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बैठक होणार आहे. धनगर समाजाची प्रगती व्हावी आणि हा समाज मुख्य प्रवाहात यावा, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर येथील धनगर समाज सेवा मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२८व्या पुण्यतिथीनिमित्त धनगर समाज मेळावा व गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी ना. श्री. मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला आमदार गोपिचंद पडळकर, चंद्रपूर धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. मगेश गुलवाडे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, सिनेट सदस्य वामन तुर्के, डॉ. तुषार मार्लावार, विलास शेरकी, साईनाथ बुच्चे, लक्ष्मीताई दरेकर, महेश देवकाते, ज्योतीताई येग्गेवार, विजय कोरेवार, श्री. गवारकर, श्री. खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिंना अभिवादन करून त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘पुण्यश्लोक अहिल्याआई होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे काम केले. महाराष्ट्रातून मालव्यापर्यंत विजयाची पताका फडकवली. जनतेच्या मनावर राज्य केले. मालव्यातील प्रत्येक ठिकाणाने अहिल्यादेवीना परमेश्वरासमान स्थान दिले आहे.

त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे आणि अभिमानही बाळगला आहे. हे चित्र मी डोळ्याने बघितले तेव्हा माझी मानही अभिमानाने उंचावली. राज्य कारभार कसा चालवावा, याचा पाठ छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अहिल्याआईंनी आपल्या कर्तृत्वातून दाखविले आहे.’

धनगर समाजाचे अनेक प्रश्न आहेत आणि ते सुटावे यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. धनगर समाजाच्या योजना एकात्मिक पद्धतीने राबविण्याचे काम व्हावे, यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लवकरच बैठक होणार आहे. धनगर समाजाने देशाच्या प्रगतीत सेवा भावी वृत्तीने आपले योगदान दिले, याची पूर्ण जाणीव सरकारला आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. 

चंद्रपूर जनतेच्या शुभेच्छा तुमच्या सोबत :- धनगर समाजाने औरंगजेबाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढा दिला. आता धनगर समाजाची मुख्य प्रवाहात येण्याची जी लढाई आहे, त्यात चंद्रपूर जनतेच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

समाज पुढे जाणार :- आपल्या समाजात किती श्रीमंत लोक आहेत, यापेक्षा किती गुणसंपन्न लोक आहेत या गोष्टीला ज्या समाजात प्रोत्साहन दिले जाते, त्या समाजाच्या प्रगतीमध्ये कितीही अडथळा आला तरीही कुणी रोखू शकत नाही, अशी भावना ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्र्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.