आयुष्यात संघर्षाशिवाय यशप्राप्ती नाही…माजी मंत्री विजय वडेट्टीवार There is no success in life without struggle… Former Minister Vijay Wadettiwar

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि.27 मे) :- आयुष्यात यश मिळवण्यासाठी सातत्य, इच्छाशक्ती व मेहनत फार महत्वाची आहे. यशाकडे वाटचाल करतांना अनेकदा आपल्याला अपयश येऊ शकते तेव्हा आपण खचून न जाता यशस्वी होण्यासाठी संघर्ष करीत राहा. कारण आयुष्यात संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नसतो असे मौलिक विचार राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

ब्रम्हपुरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहु महाराज युवाशक्ती करीअर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी विचारमंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोटीव्हेशनल स्पिकर डॉ. विनोद आसुदानी हे होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मेहंदळे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे, ने.हि.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गहाणे, शासकीय तंत्रनिकेतनचे डॉ. धनंजय पोटे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेश डांगे, माजी सभापती खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, नगरसेवक हितेंद्र राऊत यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, 10वी व 12वीचे वर्ष हे आयुष्यातील टर्निंग पॉइंट असतात. यावेळी घेतलेला चुकीचा निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. त्यामुळे ज्या क्षेत्रात जास्तीत जास्त संधी उपलब्ध होऊ शकतात ते क्षेत्र निवडावे. एकवेळ उपाशीपोटी राहा पण शिक्षण पुर्ण करा कारण आयुष्यात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.

 चीन देश विकसीत राष्ट्र आहे. तेथील युवकांनी तंत्रज्ञानाचा वापर स्वतःसह राष्ट्राच्या विकासासाठी केला आहे. मोबाईलचा अतिवापर धोकादायक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. आसुदानी यांनी सांगितले की, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी करणे फार महत्त्वाचे आहे.

कार्यक्रमाच्या ठीकाणी रोजगार व स्वयंरोजगार, शासकीय शिष्यवृत्ती योजना, आयटीआयच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना तयार केलेले नाविण्यपूर्ण माॅडेल ठेवण्यात आले होते. त्याचीही यावेळी आमदार वडेट्टीवारांसह अन्य मान्यवरांनी पाहणी केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राजेश डांगे यांनी केले. तर आभार दिलीप शेंडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटनिदेशक रावळे, प्र.गटनिदेशक वसाके, निदेशक रत्नदीप रामटेके यांसह संस्थेतील सर्व निदेशकांनी सहकार्य केले.